तक्रारीला महिनाभर उलटूनही दखल नाही संताजीनगरातील नागरिक त्रस्त
साईमत /मुक्ताईनगर / प्रतिनिधी
मुक्ताईनगर शहरातील संताजीनगर परिसरातील नागरिकांच्या तक्रारींकडे नगरपंचायत प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून तसेच स्मरणपत्र देऊनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर तक्रारदारांनी न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे.
संताजीनगर परिसरातील रहिवासी वासुदेव सिताराम काठोके यांनी याबाबत नगरपंचायत प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, शेजारील घरावरील पाण्याची टाकी भरल्यानंतर वाहून जाणारे पाणी तसेच पावसाचे पाणी योग्य पद्धतीने निचरा न झाल्यामुळे थेट त्यांच्या घराच्या आवारात साचत आहे. परिणामी घराच्या भिंतींना तडे जाण्याची शक्यता निर्माण झाली असून, सतत पाणी साचल्याने घराच्या मालमत्तेचे नुकसान होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या समस्येबाबत तक्रारदारांनी १ जुलै रोजी मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार सादर केली होती. मात्र, तक्रार दाखल करून एक महिना उलटूनही प्रशासनाकडून प्रत्यक्ष स्थळ पाहणी, पंचनामा किंवा संबंधितांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. त्यानंतर त्यांनी २७ रोजी नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना लेखी स्मरणपत्र देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.
दिलेल्या अंतिम स्मरणपत्रात तक्रारदारांनी प्रशासनाकडे विविध मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये तातडीने घटनास्थळी पाहणी करणे, संबंधित घरमालकाला नोटीस बजावणे, घराच्या आवारात येणारे पाणी त्वरित थांबविण्याचे आदेश देणे, नियमांनुसार संबंधितांवर कारवाई करणे तसेच यापूर्वी दिलेल्या तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल देण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारदारांनी प्रशासनाला इशारा देताना म्हटले आहे की, वेळेत योग्य कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासनाचे संबंधित अधिकारी, लोकायुक्त तसेच आवश्यकतेनुसार उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणात नगरपंचायत प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे संताजीनगर परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.
