साईमत न्यूज नेटवर्क –
इंडोनेशिया : इंडोनेशियातील पूर्व जावा येथील मदुरा बेटाजवळ रविवारी सकाळी भीषण दुर्घटना घडली. सुमारे २५० प्रवासी आणि कर्मचारी घेऊन जाणाऱ्या ‘केएमपी मुतियारा सेंटोसा २’ या प्रवासी फेरीला अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. या दुर्घटनेत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून, ४१ प्रवासी अद्याप बेपत्ता आहेत. बेपत्ता नागरिकांच्या शोधासाठी इंडोनेशियाच्या बचाव पथकांकडून युद्धपातळीवर मोहीम राबविण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही फेरी सुराबाया येथील तंजुंग पेराक बंदरातून सुलावेसी बेटावरील मकासार शहराच्या दिशेने जात होती. प्रवास सुरू झाल्यानंतर काही तासांतच जहाजाच्या कॅप्टनने फेरीला आग लागल्याची माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच जहाजाचा रेडिओ आणि नेव्हिगेशनशी असलेला संपर्क तुटला.
सुराबाया शोध व बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त फेरी सापुदी बेटापासून सुमारे १९ मैल अंतरावर आढळून आली. घटनेची माहिती मिळताच जवळपासच्या जहाजांना मदतीसाठी रवाना करण्यात आले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आगीने काही क्षणांतच संपूर्ण फेरीला वेढले. जहाजातून मोठ्या प्रमाणात काळा धूर निघत होता. अनेक प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी लाइफ जॅकेट घातले आणि फेरीच्या पुढील भागात तसेच नियंत्रण कक्षाजवळ आश्रय घेतला.
आगीपासून बचाव करण्यासाठी अनेक प्रवाशांनी खवळलेल्या समुद्रात उड्या घेतल्या. त्यांना वाचवण्यासाठी जवळून जाणाऱ्या जहाजांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. ‘टीबी हसनूर २६’ आणि ‘ब्रिटिश मेंटॉर’ या जहाजांनी समुद्रात उतरलेल्या प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे.
सुराबाया शोध व बचाव कार्यालयाचे प्रमुख नानंग सिगिट यांनी सांगितले की, दुर्घटनास्थळी चार मोठी जहाजे पोहोचली असून, मुख्य बचाव जहाज ‘एसएआर २४९ परमाडी’ देखील घटनास्थळी पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, फेरीला आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास सुरू असून, बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांकडून समुद्र परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू आहे. या दुर्घटनेमुळे इंडोनेशियात हळहळ व्यक्त केली जात आहे.
