तोरणाळा जंगलात गोड बोलून नेले, दगडाने केला घात; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू फत्तेपूर पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू
साईमत /जामनेर / प्रतिनिधी
आंतरजातीय प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून शालकाने आपल्या मेहुण्यावर दगडाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना जामनेर तालुक्यातील फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, आंतरजातीय विवाहाच्या वादातून झालेल्या हिंसाचाराचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
फत्तेपूर येथील सुभाषपुरा परिसरात राहणारा प्रशांत सुभाष चौधरी (वय २६) याने काही काळापूर्वी शेजारच्या गावातील एका तरुणीसोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. या विवाहाला तरुणीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. विशेषतः तिच्या भावाच्या मनात या विवाहाबाबत तीव्र नाराजी होती. याच रागातून त्याने प्रशांतला संपवण्याचा कट रचल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शालकाने प्रशांतशी गोड बोलून त्याला तोरणाळा जंगल परिसरात नेले. तेथे दोघांनी मद्यपान केले. प्रशांत मद्याच्या नशेत असताना आरोपीने त्याच्या डोक्यात मोठा दगड घालून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात प्रशांत गंभीर जखमी झाला. त्याचा मृत्यू झाल्याचे समजून आरोपीने त्याला जवळील खड्ड्यात टाकून दिले. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याच्या अंगावर झाडांची पाने टाकून घटनास्थळावरून पळ काढला.
दरम्यान, प्रशांत घरी न परतल्याने त्याची आई सरला चौधरी यांनी फत्तेपूर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. शोध घेत असताना तोरणाळा जंगल परिसरात प्रशांत जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने उपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले.
रुग्णालयात डॉक्टरांचे उपचार सुरू असतानाच शुक्रवारी प्रशांतची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्याच्या मृत्यूनंतर या प्रकरणातील गुन्ह्याचे स्वरूप अधिक गंभीर झाले असून, पोलिसांकडून आरोपीविरोधात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या घटनेमुळे आंतरजातीय विवाहाच्या कारणातून निर्माण होणाऱ्या सामाजिक तणावाचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशांतच्या मृत्यूने फत्तेपूर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
