घरात शिरणारे पाणी रोखताना कच्ची भिंत कोसळली वृद्ध शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
साईमत /पारोळा / प्रतिनिधी
संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीने पारोळा तालुक्यातील भोलाणे येथे एका वृद्ध शेतकऱ्याचा बळी घेतला. घरात शिरणारे पावसाचे पाणी रोखण्यासाठी प्रयत्न करत असताना कच्च्या भिंतीचे दगड अंगावर कोसळल्याने गंभीर दुखापत होऊन ६५ वर्षीय शेतकरी प्रकाश अर्जुन करंजे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून मुसळधार पावसामुळे जुन्या व कच्च्या घरांबाबत निर्माण झालेला धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. ३१) सकाळपासून परिसरात संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे प्रकाश करंजे हे दिवसभर घरीच होते. त्यांच्या घराच्या पाठीमागे असलेल्या नाल्याला मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने ते घरात शिरू लागले होते. सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास घरात पाणी अधिक प्रमाणात येऊ नये म्हणून त्यांनी नाल्याजवळ अडकलेली घाण व कचरा बाजूला करण्यास सुरुवात केली.
याचवेळी पावसामुळे कमकुवत झालेल्या कच्च्या पायावरील भिंतीचा काही भाग अचानक कोसळला. भिंतीचे दगड थेट त्यांच्या अंगावर पडल्याने त्यांचा तोल गेला आणि ते दगडांवर आपटले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. परिसरातील नागरिकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली. प्रकाश करंजे हे कष्टाळू आणि सर्वपरिचित शेतकरी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अकाली निधनामुळे भोलाणे गावावर दुःखाची छाया पसरली आहे.
दरम्यान, कांतीलाल करंजे यांनी दिलेल्या माहितीवरून पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार कैलास साळुंखे करीत आहेत. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कच्च्या व जीर्ण घरांपासून सुरक्षित अंतर राखावे तसेच धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
