मुसळधार पावसामुळे प्रशासन सतर्क; धोकादायक ठिकाणांपासून दूर राहण्याचे आवाहन
साईमत /पाळधी, ता. धरणगाव / प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यासह शहर आणि ग्रामीण भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी-नाले, ओढे आणि लहान पुलांवरील पाण्याची पातळी झपाट्याने वाढू लागली आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी आणि ग्रामस्थांनी अत्यंत सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे. तसेच जिल्हा प्रशासनासह सर्व संबंधित यंत्रणांना २४ तास सज्ज राहून नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी असून कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. हवामान व आपत्तीबाबत प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचना आणि इशाऱ्यांचे काटेकोरपणे पालन करावे. अतिवृष्टीच्या काळात अनावश्यक प्रवास टाळण्याबरोबरच पाण्याखाली गेलेले पूल, वेगाने वाहणारे नदी-नाले, ओढे किंवा रस्ते ओलांडण्याचा कोणताही प्रयत्न करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकरी बांधवांनीही पावसाळी परिस्थितीत शेतीची कामे करताना विशेष दक्षता घ्यावी. वीजेचे खांब, तुटलेल्या वीजवाहिन्या, पाण्याने वेढलेली ठिकाणे तसेच अन्य धोकादायक परिसरापासून सुरक्षित अंतर राखावे. जनावरांची सुरक्षिततेचीही काळजी घेत त्यांना उंच व सुरक्षित ठिकाणी हलविण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन त्यांनी केले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या माध्यमातून पोलीस विभाग, महसूल प्रशासन, महानगरपालिका, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महावितरण, आरोग्य विभाग तसेच इतर सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. कोणत्याही भागात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना त्वरित मदत मिळावी, यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
नागरिकांनी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ स्थानिक प्रशासन, तहसील कार्यालय, ग्रामपंचायत, पोलीस यंत्रणा किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
“संयम, सतर्कता आणि परस्पर सहकार्याच्या बळावर कोणत्याही नैसर्गिक संकटाचा सामना करता येतो. शासन आणि प्रशासन नागरिकांच्या सेवेसाठी पूर्ण क्षमतेने सज्ज असून प्रत्येकाने स्वतःची, आपल्या कुटुंबाची तसेच परिसरातील इतर नागरिकांची सुरक्षितता हीच सर्वोच्च जबाबदारी मानून आवश्यक ती खबरदारी घ्यावी,” असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.
