हरिनाम, संतवाणी, गुरु पूजन आणि महाप्रसादाने परिसर भक्तिमय
साईमत -पाचोरा- प्रतिनिधी
येथील लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार हरिनाम, भजन, संतवाणी, गुरु पूजन, प्रवचन आणि महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. पंचक्रोशीतील भाविक, वारकरी आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाची सुरुवात हरिनामाच्या गजराने, भजन आणि संतवाणीने झाली. परिसरातील विविध भजनी मंडळांनी सुमधुर भजनांच्या माध्यमातून भक्तिमय वातावरण निर्माण केले. त्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज तसेच गुरु परंपरेचे विधिवत पूजन करण्यात आले. उपस्थितांनी गुरूजनांना पुष्पहार अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेत कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी भागवताचार्य ह.भ.प. योगेश महाराज धामणगावकर यांनी गुरु महिमा, संत परंपरा आणि वारकरी संप्रदायातील गुरु-शिष्य नात्याचे महत्त्व यावर प्रभावी मार्गदर्शन केले. गुरु हे ज्ञान, संस्कार आणि अध्यात्माचे मूर्तिमंत स्वरूप असून त्यांच्या मार्गदर्शनामुळेच जीवनाला योग्य दिशा मिळते, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला. त्यांच्या प्रवचनाने उपस्थित भाविकांमध्ये आध्यात्मिक जागृती निर्माण झाली.
संस्थेतील विद्यार्थ्यांनी भजन, अभंग आणि हरिपाठाचे सादरीकरण करून उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळवली. गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त अनेक युवकांनी वारकरी संप्रदायाची माळ धारण करून संतांच्या विचारांनुसार आध्यात्मिक, आनंदी आणि समृद्ध जीवन जगण्याचा संकल्प केला.
या कार्यक्रमाला पाचोरा शहरासह मोंढाळे, पुंगाव, मानकी, अंतुर्ली, बांबरुड, लोटार, चिंचखेडे, खडकदेवडा तसेच बाहेरपुरा, कृष्णापुरी आणि सिंधी कॉलनी परिसरातील भाविक, वारकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी पाचोरा तालुक्याचे तहसीलदार विजय बनसोडे, रमेश मोर, दगाजी महाराज बिल्डीकर, महादू महाराज, मदन महाराज, श्रीराम नाना महाजन, अशोक आप्पा महाजन, भास्कर अण्णा, शोभाताई चौधरी, आप्पा ओझर, पुंगाव येथील चिंतामण पाटील, प्रल्हाद गुजर यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या अध्यक्षा ह.भ.प. सुनीताताई पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
