साईमत न्यूज नेटवर्क –
अंबरनाथ पूर्व येथील पालेगाव परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका उंच इमारतीच्या १२व्या मजल्यावरून एका व्यक्तीने मांजरीला खाली ढकलल्याचा आरोप असून, या घटनेत मांजरीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. संपूर्ण प्रकार इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
ही घटना अंबरनाथ पूर्व येथील रॉयल फ्लोरा फेज-२ या निवासी संकुलातील ए विंगमध्ये घडली. रविवारी, २६ जुलै रोजी रात्री हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मांजर १२व्या मजल्यावरील डक्टच्या भिंतीवरून चालताना दिसते. त्याचवेळी एक वृद्ध व्यक्ती तेथे येतो. मांजर त्याला वाट करून देण्याचा प्रयत्न करत असतानाही संबंधित व्यक्तीने तिला खाली ढकलल्याचे फुटेजमध्ये दिसत असल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर संबंधित व्यक्ती खाली वाकून पाहत असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसते.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संबंधित व्यक्तीवर प्राणी संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, संबंधित व्यक्तीने असे कृत्य नेमके कोणत्या कारणामुळे केले, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणाची शिवाजीनगर पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
