साईमत न्यूज नेटवर्क –
अमरावती : बाजारपेठ, प्रवास किंवा इतर ठिकाणी मोबाईल हरविण्याच्या अथवा चोरीला जाण्याच्या घटना वारंवार घडत असतात. अनेकदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करूनही मोबाईलचा शोध लागत नाही. मात्र अमरावती शहर पोलिसांनी सायबर तपासाच्या मदतीने उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल ३७७ हरविलेले आणि चोरीस गेलेले मोबाईल शोधून संबंधित नागरिकांना परत दिले आहेत.
शहरातील विविध पोलीस ठाणे आणि सायबर पोलीस ठाण्याने संयुक्तपणे CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलचा वापर करून ही मोहीम राबविली. या कारवाईदरम्यान सुमारे ₹६५ लाख ६३ हजार ८०० किमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले. त्यानंतर पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी नागरिकांना मोबाईल हरवल्यास किंवा चोरीस गेल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे आणि CEIR पोर्टलवर आवश्यक माहिती नोंदविण्याचे आवाहन केले. तसेच सायबर फसवणूक किंवा इतर सायबर गुन्ह्यांच्या प्रकरणात राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा किंवा सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असेही त्यांनी सांगितले.
अमरावती शहर पोलिसांच्या या यशस्वी मोहिमेमुळे हरविलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, सायबर गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई करण्याच्या दृष्टीने ही मोहीम महत्त्वाची ठरत असल्याचे बोलले जात आहे.
