खड्डे, चिखल आणि अर्धवट कामे नागरिकांची नगरपरिषदेकडे तातडीच्या कारवाईची मागणी
साईमत /नाशिराबाद /प्रतिनिधी
शहरातील दत्तनगर परिसरात अमृत योजना आणि भूमिगत गटार योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांचा वेग मंदावल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. खोदकाम करून रस्ते अपूर्ण अवस्थेत सोडण्यात आल्यामुळे वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली असून पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. याबाबत संतप्त नागरिकांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदन देत त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
दत्तनगर येथील रहिवासी शैलेश मनोहर गजऋषी यांनी सादर केलेल्या निवेदनात विकासकामांच्या दर्जाबाबत आणि संथ गतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अनेक ठिकाणी कामे अर्धवट सोडल्याने रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून उखडलेला मुरूम व चिखलामुळे परिसरातील नागरिकांना रोजच जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर दुचाकीस्वार, रिक्षाचालक तसेच चारचाकी वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचत असल्याने त्यांची खोली लक्षात येत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली असून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या परिस्थितीचा सर्वाधिक फटका आजारी आणि ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. परिसरातील ७५ वर्षीय आजारी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी रिक्षा किंवा अन्य वाहन घरापर्यंत पोहोचू शकत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीतही नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाकडे तात्काळ पाहणी करून रस्त्यांवरील खड्डे भरावेत, वाहतुकीसाठी तात्पुरती व्यवस्था करावी आणि रखडलेली अमृत योजना व भूमिगत गटार योजनेची सर्व कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावीत, अशी मागणी केली आहे. केवळ कागदोपत्री कामे पूर्ण झाल्याचे दाखवण्याऐवजी प्रत्यक्षात नागरिकांना दिलासा मिळेल, अशा पद्धतीने कामे पूर्ण करावीत, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
दत्तनगर परिसरातील नागरिकांचा संयम आता संपत चालला असून प्रशासनाने त्वरित निर्णय घेऊन विकासकामे पूर्ण केली नाहीत, तर तीव्र आंदोलनाचा इशाराही नागरिकांकडून देण्यात येत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
