साईमत -अमळनेर- प्रतिनिधी |
कर्जबाजारीपणा आणि सततच्या नैराश्याला कंटाळून एका ३२ वर्षीय तरुण शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना अमळनेर तालुक्यातील खेडी येथे उघडकीस आली आहे. श्याम सुनील पाटील (वय ३२, रा. खेडी) असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. २७ जुलै रोजी ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून गावावर शोककळा पसरली आहे.
नापिकी आणि कर्जाची विवंचना
मिळालेल्या माहितीनुसार, मृत श्याम पाटील यांच्याकडे अवघी दीड एकर शेती होती. यंदाचा खरीप हंगाम देखील हातातून जाण्याच्या मार्गावर असल्याने डोक्यावरील कर्जाचा डोंगर कसा फेडायचा, या विवंचनेत ते सतत वावरत होते. त्यातच दोन वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाल्यामुळे ते गेल्या काही काळापासून प्रचंड मानसिक नैराश्यात होते.
शोध घेतला अन् विहिरीत आढळला मृतदेह
२६ जुलै रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास श्याम हे कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेले होते. उशिरापर्यंत ते घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, गावालगतच्या शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. दुपारी अडीच वाजता शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
