सलग दोन सुवर्णपदकांची झेप साध्वी चौधरीची SAI प्रशिक्षणासाठी निवड
साईमत /भडगाव /प्रतिनिधी
जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या भडगाव तालुक्यातील कोळगाव येथील साध्वी मीनाक्षी प्रल्हाद चौधरी हिच्या क्रीडा कारकिर्दीला आता नवी दिशा मिळाली आहे. सलग दोन वर्षे राष्ट्रीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणाऱ्या साध्वीची भारतीय खेळ प्राधिकरणाच्या (Sports Authority of India – SAI) छत्रपती संभाजीनगर येथील प्रशिक्षण केंद्रासाठी निवड झाली आहे. ही निवड तिच्या उज्ज्वल क्रीडा प्रवासातील महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे.
कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील किसान शिक्षण संस्था, भडगाव संचलित गोपीचंद पुना पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोळगाव येथील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी असलेल्या साध्वीने किसान स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून वेटलिफ्टिंगमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात तिचे नाव ठळकपणे पुढे आले आहे.
साध्वीने मणिपूरमधील इंफाळ येथे झालेल्या ६८व्या राष्ट्रीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत तसेच अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे झालेल्या ६९व्या राष्ट्रीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत १७ वर्षांखालील गटात सुवर्णपदक पटकावत आपल्या कौशल्याची चमक दाखवली. सलग दोन राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवून तिने महाराष्ट्राचा झेंडा राष्ट्रीय स्तरावर अभिमानाने फडकवला आहे.
याशिवाय वेटलिफ्टिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित राष्ट्रीय स्पर्धेतही साध्वीने कांस्यपदकाची कमाई करत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. राष्ट्रीय स्तरावर सातत्याने मिळवलेल्या यशामुळे भारतीय खेळ प्राधिकरणाने तिच्या गुणवत्तेची दखल घेत छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील SAI प्रशिक्षण केंद्रात विशेष प्रशिक्षणासाठी तिची निवड केली आहे.
या प्रशिक्षण केंद्रात साध्वीला अत्याधुनिक क्रीडा सुविधा, तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. भविष्यात देशाचे प्रतिनिधित्व करण्याच्या तिच्या स्वप्नांना या प्रशिक्षणामुळे नवी बळकटी मिळणार आहे.
साध्वीच्या यशामागे अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले आहे. शिवछत्रपती पुरस्कार विजेते सुनील दळवी, पैलवान प्रल्हाद चौधरी, मीनाक्षी चौधरी, राष्ट्रीय कुस्तीपटू स्वराज चौधरी, आदर्श क्रीडा शिक्षक तथा पर्यवेक्षक बी. डी. साळुंखे, प्रा. रघुनाथ पाटील तसेच राष्ट्रीय खो-खो पंच प्रा. प्रेमचंद चौधरी यांनी तिच्या क्रीडा प्रवासात मोलाची साथ दिली आहे.
साध्वीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे चेअरमन तथा जळगाव जिल्हा बँक संचालक प्रतापराव पाटील, संस्थेच्या उपाध्यक्षा तथा जळगाव जिल्हा दूध फेडरेशन संचालिका डॉ. पुनमताई पाटील, मंत्रालयीन उपसचिव प्रशांतराव पाटील, प्राचार्य आर. आर. वळखंडे, पर्यवेक्षक बी. डी. साळुंखे, प्रभारी कार्यवाहक एम. ए. पवार यांच्यासह विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय स्तरावरील यशाची मालिका कायम ठेवत भारतीय खेळ प्राधिकरणाच्या प्रशिक्षणासाठी झालेली साध्वी चौधरीची निवड ही गोपीचंद पुना पाटील विद्यालय, किसान स्पोर्ट्स अकॅडमी, भडगाव तालुका आणि जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. तिच्या या यशामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळाली असून भविष्यात ती देशासाठी गौरवास्पद कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
