वाढत्या छेडछाडीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी शेतकरी संघटना, पत्रकार व नागरिकांचे पोलिसांना निवेदन
साईमत /मलकापूर /प्रतिनिधी
शहरासह ग्रामीण भागातील महिला, युवती व विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मलकापूर शहरासह बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ‘दामिनी पथक’ तातडीने कार्यान्वित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी संघटना, पत्रकार व नागरिकांच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच उपविभागीय महसूल अधिकारी, मलकापूर यांना निवेदन सादर करण्यात आले.
मलकापूर शहरात तसेच परिसरातील ग्रामीण भागातून शेकडो विद्यार्थिनी, महिला व युवती शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि विविध कामांसाठी दररोज ये-जा करतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून महिला व मुलींची छेडछाड करणे, त्यांचा पाठलाग करणे, अश्लील हावभाव करणे, वाईट नजरेने पाहणे तसेच विनयभंगाचा प्रयत्न करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. शहरातील प्रमुख रस्ते, शाळा-महाविद्यालय परिसर, बसस्थानक, रेल्वे स्थानक, बाजारपेठ, उद्याने तसेच गर्दीच्या ठिकाणी काही रोडरोमिओ व समाजकंटकांकडून महिलांना मानसिक त्रास देण्याच्या घटना घडत असल्याने अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.
यापूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ‘दामिनी पथक’ प्रभावीपणे कार्यरत होते. या पथकाच्या माध्यमातून महिलांच्या तक्रारींवर तत्काळ दखल घेतली जात होती तसेच समाजकंटकांवर पोलिसांचा वचक निर्माण झाला होता. त्यामुळे महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. मात्र, सध्या हे पथक प्रभावीपणे कार्यरत नसल्याने महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाल्याचे निवेदनकर्त्यांनी नमूद केले.
महिलांवरील संभाव्य अत्याचार, छेडछाड व त्रासाच्या घटना रोखण्यासाठी ‘दामिनी पथक’ पुन्हा सक्रिय करावे, संवेदनशील भागात नियमित गस्त वाढवावी, शाळा व महाविद्यालय परिसरात विशेष लक्ष ठेवावे तसेच महिला सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
यावेळी बाळू पाटील, प्रविण क्षिरसागर, निलेश नारखेडे, पत्रकार मनोज पाटील, शेख जमील शेख जान मोहम्मद, सतीश दांडगे, नारायण पानसरे, निलेश चोपडे, राजेश इंगळे, अशोक रावणकार, सैयद ताहेर, शेख निसार, अजय टप, सुरेश मराठे, शुभम नेमाने यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.महिलांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलून ‘दामिनी पथक’ पुन्हा कार्यान्वित करावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
