‘ज्ञान व संस्कारातून उज्ज्वल भविष्य’चा संदेश देत विद्यार्थ्यांची भव्य वारकरी दिंडी
साईमत /जळगाव /प्रतिनिधी
शिवाजीनगर येथील कै. इंदिराबाई पाटणकर नवीन मराठी शाळेत आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य वारकरी दिंडी सोहळ्यात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषेत सहभागी होत विठ्ठल नामाचा अखंड जयघोष केला. टाळ-मृदंगाच्या निनादात आणि अभंग-भजनांच्या सुरावटीत निघालेल्या दिंडीने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
शाळेपासून शिवाजीनगर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापर्यंत काढण्यात आलेल्या दिंडीत विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रुक्मिणी, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर तसेच वारकरी यांच्या आकर्षक वेशभूषा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक फेटे, तुळशीमाळा, भगवे झेंडे आणि टाळ-मृदंगाच्या साथीने विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वारकरी संस्कृतीच्या दर्शनाने दिंडीला विशेष आकर्षण प्राप्त झाले.
‘ज्ञान व संस्कारातून उज्ज्वल भविष्य घडवू या’ या शाळेच्या ब्रीदविचाराला अनुसरून विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा, भक्तीभाव, नैतिक मूल्ये, सामाजिक ऐक्य आणि भारतीय संस्कृतीबद्दल आदर निर्माण व्हावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिंडीमुळे विद्यार्थ्यांना आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची प्रत्यक्ष ओळख करून देण्याचा प्रयत्न शाळेने केला.
या दिंडीत शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांचा उत्साह, शिस्तबद्ध सहभाग आणि आकर्षक वेशभूषा यामुळे दिंडीचे सर्वत्र कौतुक झाले. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या संस्कारमय उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्याची भावना अधिक दृढ झाली.
