साईमत -भडगाव- प्रतिनिधी |
दारूच्या महाभयंकर व्यसनाने पुन्हा एकदा एका हसत्या-खेळत्या संसाराचा करुण अंत केला आहे. दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून संतापलेल्या पतीने पोटच्या गोळ्यांच्या छत्रछायेची पर्वा न करता पत्नीचा चाकूने भोसकून खून केल्याची संतापजनक घटना भडगाव तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथे रविवारी सकाळी घडली. या घटनेने परिसर सुन्न झाला असून भडगाव पोलिसांनी तत्परता दाखवत नराधम पतीला बेड्या ठोकल्या आहेत.
ललिता आत्माराम राठोड (वय ३६) असे मृत दुर्दैवी महिलेचे नाव असून, आत्माराम पतीलाल राठोड (वय ४०) असे गजाआड झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे.
पैसे देण्यास नकार दिला अन्…
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आत्माराम याला दारूचे तीव्र व्यसन असून त्यावरून घरात नेहमी भांडणे होत असत. रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास आत्मारामने पुन्हा दारूसाठी पत्नी ललिता यांच्याकडे पैशांचा हट्ट धरला. ललिता यांनी पैसे देण्यास ठाम नकार दिल्याने संतापलेल्या आत्मारामने त्यांच्याशी शिवीगाळ करत वाद घातला. हा वाद विकोपाला गेला आणि आत्मारामने घरातील धारदार चाकू आणून ललिता यांच्या पोटावर थेट वार केले. वार वर्मी बसल्याने ललिता रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. फॉरेन्सिक पथकाला पाचारण करून घटनेचे पंचनामे व पुरावे गोळा करण्यात आले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भडगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
भावाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल
मयत महिलेचे भाऊ प्रकाश मेहराम चव्हाण (रा. दळवेल, ता. पारोळा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी आत्माराम राठोडविरुद्ध भडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी कारंकार पुढील तपास करत आहेत.
