वारकऱ्यांच्या सेवेसाठी शिवसेना-युवासेनेचा पुढाकार रेल्वेतील भाविकांचे उत्साहात स्वागत करून धरणगाव स्थानकावर फराळाचे वाटप करण्यात आले
साईमत /पाळधी (ता. धरणगाव) /प्रतिनिधी
आषाढी वारीच्या पावन पर्वानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना होणाऱ्या वारकरी भाविकांच्या सेवेसाठी धरणगाव रेल्वे स्थानकावर शिवसेना व युवासेनेने सेवाभावाचा अनोखा उपक्रम राबविला. उधना–मिरज (पंढरपूर) विशेष रेल्वे धरणगाव स्थानकावर दाखल होताच वारकऱ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. यानंतर भाविकांना फराळाचे वाटप करून त्यांच्या प्रवासाला शुभेच्छा देण्यात आल्या.
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रेरणेतून आणि जिल्हा परिषद सदस्य युवा नेते प्रतापराव (प्रतापभाऊ) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. विठ्ठलनामाच्या गजरात रेल्वे स्थानक परिसर भक्तिमय झाला होता. विशेष रेल्वेतून प्रवास करणाऱ्या शेकडो वारकऱ्यांना प्रेमाने फराळाचे वाटप करण्यात आले. स्वयंसेवकांनी अत्यंत नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध पद्धतीने हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडला.
सेवाभावातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे वारकरी भाविकांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले. वारकऱ्यांच्या प्रवासात दिलासा देणारा हा उपक्रम असल्याची भावना अनेक भाविकांनी व्यक्त केली. सामाजिक बांधिलकी जपत धार्मिक परंपरांशी नाळ जोडणाऱ्या अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश जात असल्याचेही नागरिकांनी सांगितले.
यावेळी प्रतापभाऊ पाटील यांच्यासह दिनेशभाऊ कडोसे, गोपालभाऊ, दीपकभाऊ भदाणे, गणेशभाऊ भिंगणे, रोहितभाऊ पाटील, मंगेशभाऊ पाटील, राजभाऊ वाघरे, नयनभाऊ वाघरे, भावेशभाऊ पाटील, योगेशभाऊ पाटील, जिग्नेशभाऊ पाटील, प्रवीणभाऊ पाटील, रोनकभाऊ पाटील, राजभाऊ माळी, बंटीभाऊ भदाणे तसेच धरणगाव तालुक्यातील शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वारकरी संप्रदायाची सेवा हीच खरी ईश्वरसेवा मानत अशा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन पुढेही सातत्याने करण्यात येईल, असा निर्धार यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
