साईमत -धरणगाव – प्रतिनिधी |
धरणगाव-जळगाव मार्गावरील श्री स्वामी समर्थ फ्लोअर मिलजवळ शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास एसटी बस, आयशर ट्रक आणि खडीने भरलेला ट्राला यांच्यात थरारक तिहेरी अपघात घडला. या भीषण अपघातात ८ प्रवासी गंभीर जखमी झाले असून, खडीचा ट्राला रस्त्यावरच पलटी झाला. अपघातातील सर्व जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
ओव्हरटेकच्या प्रयत्नात झाला थरार!
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात घडल्याचा अंदाज वर्तवला जात आह. शिरपूरत आगाराची एसटी बस (MH 20 BL 2736) जळगावहून शिरपूरकडे जात होती, तर त्याच दिशेने खडीने भरलेला ट्राला धरणगावकडे चालला होता.
दरम्यान, धरणगावकडून जळगावकडे येणाऱ्या आयशर ट्रकाची (MH 18 BZ 3232) आणि समोरून येणाऱ्या वाहनांची स्वामी समर्थ फ्लोअर मिलजवळ जोरदार धडक झाली.
हा अपघात इतका भीषण होता की वाहनांच्या धडकेचा प्रचंड आवाज दूरवर ऐकू गेला. अपघातानंतर खडीचा ट्राला रस्त्याच्या मध्येच पलटी झाल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने बाहेर काढून शासकीय रुग्णालयात रवाना केले. तसेच पलटी झालेला ट्राला बाजूला करून रस्त्यावरील वाहनांच्या लांबच लांब रांगा पूर्ववत करत वाहतूक सुरळीत केली.
या मदतकार्यात पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बडगुजर, सहाय्यक फौजदार संजय पाटील, हवालदार सत्यवान पवार, नितीन पाटील व संदीप पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
अपघाताची तीव्रता पाहाता सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा पुढील अधिक तपास धरणगाव पोलीस करत आहेत.
