साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
शासकीय कार्यालयांचा परिसर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली आज (२४ जुलै) जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विशेष स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण उपक्रम उत्साहात पार पडला.
या मोहिमेदरम्यान जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष स्वच्छता गृहीत धरत परिसर स्वच्छ केला. त्यानंतर विविध देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
‘स्वच्छता ही दैनंदिन सवय बनावी’ — जिल्हाधिकारी रोहन घुगे
याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी रोहन घुगे म्हणाले,
”स्वच्छता ही केवळ एकदिवसीय मोहीम नसून ती प्रत्येकाची दैनंदिन सवय बनली पाहिजे. शासकीय कार्यालयांचा परिसर स्वच्छ, हरित व प्रसन्न ठेवण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामूहिक जबाबदारी स्वीकारावी. वृक्षारोपणासोबतच लावलेल्या प्रत्येक रोपाचे संवर्धन करणे तितकेच महत्त्वाचे आहे.”
या अभियानात जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. परिसर स्वच्छ करून प्लास्टिक व इतर कचऱ्याचे संकलन करण्यात आले. मोहिमेच्या शेवटी उपस्थितांनी परिसर स्वच्छ ठेवण्याची आणि लावलेल्या वृक्षांचे नियमित संगोपन करण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली.
हा उपक्रम इतर सर्व शासकीय कार्यालयांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
या मोहिमेत अपर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकर, उपजिल्हाधिकारी मंजुषा घाटगे (रोहयो), जितेंद्र कुवर (पुनर्वसन), विजयकुमार ढगे (महसूल प्रशासन), तहसीलदार सूर्यवंशी, उमा ढेकळे, तसेच ‘वी-ड्रीम सेवाभावी संस्था’ आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
