श्री विठ्ठल मंदिराचा भव्य रथोत्सव २५ जुलैला
साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
जळगावातील ‘प्रतिपंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंप्राळा येथील श्री विठ्ठल मंदिर संस्थानच्या पारंपरिक रथोत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. यंदाचा हा भव्य रथोत्सव २५ जुलै रोजी अत्यंत भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्यानिमित्त सध्या मंदिर परिसर आणि संपूर्ण पिंप्राळा गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पांडुरंगाच्या ऐतिहासिक आणि भव्य रथाची रंगरंगोटी, आकर्षक सजावट, तसेच आवश्यक दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर पूर्ण केली जात आहेत. मंदिर प्रशासन, सेवेकरी आणि स्थानिक भाविकांच्या एकत्रित सहकार्यातून या उत्सवाचे नियोजन केले जात आहे.
१५० वर्षांची अखंड परंपरा
पिंप्राळा येथील श्री विठ्ठल मंदिराच्या या रथोत्सवाला सुमारे १५० वर्षांची अखंड आणि उज्ज्वल धार्मिक परंपरा लाभली आहे. ही प्राचीन परंपरा आजही पिंप्राळावासीय तितक्याच श्रद्धेने आणि आस्थेने जपत आहेत. रथोत्सवाच्या दिवशी विठुरायाच्या मनमोहक रूपासोबतच हा पवित्र रथ ओढण्यासाठी आणि दर्शनासाठी जळगाव शहरासह आसपासच्या परिसरातून हजारो भाविकांची अलोट गर्दी होते.
५०० किलो पंजिरी प्रसादाचे विशेष आकर्षण!
यंदाच्या रथोत्सवात भाविकांसाठी विशेष आकर्षण असणार आहे ते म्हणजे प्रसाद! यावर्षी मंदिर संस्थानतर्फे सुमारे ५०० किलो पंजिरी प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
उत्सवाच्या दिवशी संपूर्ण परिसर ‘विठ्ठल रुक्मिणी’च्या जयघोषाने आणि भक्तिमय वातावरणाने दुमदुमून जाणार असून, भाविकांनी या पावन सोहळ्याचा आणि दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर संस्थान व सेवेकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
