न्यू इंग्लिश स्कूल परिसरातील न्यू प्लॉट एरियामध्ये चिखलाचे साम्राज्य; अपघातांचे सत्र सुरु, नगरपरिषदेला आंदोलनाचा इशारा!
साईमत -नशिराबाद- प्रतिनिधी |
नशिराबाद शहरातील गणेशनगर आणि दत्तनगर परिसरातील न्यू इंग्लिश स्कूलजवळील न्यू प्लॉट एरियात प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसावा लागत आहे. ‘अमृत योजने’अंतर्गत करण्यात आलेल्या खोदकामानंतर रस्ता पूर्ववत दुरुस्त न केल्यामुळे परिसरात खड्ड्यांचे आणि चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.
या संदर्भात नगरपरिषदेला वारंवार विनंती करूनही प्रशासनाने डोळ्यांवर गांधारीची पट्टी बांधल्याने, स्थानिक रहिवासी देवेंद्र भंगाळे यांनी नशिराबाद नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना ‘स्मरणपत्र’ पाठवून थेट इशारा दिला आहे.
निवेदनानुसार, या गंभीर समस्येबाबत सुमारे २० दिवसांपूर्वी नगरपरिषदेकडे लेखी अर्ज सादर करण्यात आला होता. मात्र, प्रशासनाला या त्रासाची साधी पाहणी करण्याची तसदीही वाटलेली नाही.
”वर्षभरापूर्वीच तयार झालेला नवा रस्ता अमृत योजनेच्या नावाखाली उकरला आणि नंतर तो तसाच वाऱ्यावर सोडून दिला,” असा संताप स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केला आहे. सध्या पडणाऱ्या पावसामुळे या रस्त्यावर प्रचंड चिखल साचला असून नागरिकांचे चालणेही मुश्कील झाले आहे.
शाळकरी मुलांचा जीव धोक्यात
रस्त्याची दुरवस्था आणि चिखलामुळे रोज लहान-मोठे अपघात घडत आहेत:
विद्यार्थ्यांचे हाल: परिसरात न्यू इंग्लिश स्कूल असल्याने दररोज शेकडो विद्यार्थ्यांना याच चिखलातून वाट काढावी लागते. अनेक शाळकरी मुले चिखलात घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
दुचाकींचे अपघात: रस्ता निसरडा झाल्यामुळे दुचाकी घसरून नागरिक जखमी होत आहेत.
आरोग्याचा प्रश्न: साचलेल्या डबक्यांमुळे डासांची पैदास वाढली असून संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.
“अपघात झाल्यास जबाबदारी नगरपरिषदेची!” – नागरिकांचा इशारा
प्रशासनाच्या या अकार्यक्षमतेवर संताप व्यक्त करत नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भविष्यात कोणताही मोठा अपघात घडल्यास किंवा एखाद्या नागरिकाला दुखापत झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी नशिराबाद नगरपरिषद प्रशासनाची राहील.
नागरिकांच्या सुरक्षिततेचा, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आणि आरोग्याचा विचार करून या रस्त्याची त्वरित पाहणी करावी अन् कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
या स्मरणपत्राच्या प्रती केवळ नगरपरिषदेपुरत्या मर्यादित न ठेवता जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आणि नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय येथेही पाठवण्यात आल्या आहेत. आता तरी ढिम्म प्रशासन जागे होणार की अपघाताची वाट पाहणार? याकडे संपूर्ण नशिराबादकरांचे लक्ष लागले आहे.
