१०८ मीटर साडी अर्पण करून दिला सामाजिकतेचा संदेश
साईमत /भुसावळ /प्रतिनिधी
सूर्यकन्या माता तापी नदीच्या जन्मोत्सवानिमित्त भुसावळ शहरात धार्मिक उत्साह आणि सामाजिक बांधिलकीचा संगम पाहायला मिळाला. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात भाविकांनी माता तापीला तब्बल १०८ मीटर लांबीची साडी अर्पण करून अनोखी श्रद्धा व्यक्त केली. महाआरती, पूजन, भजन-कीर्तन, भव्य शोभायात्रा आणि वृक्षारोपण अशा विविध उपक्रमांनी तापी जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे पौराहित्य मंगेश जोशी यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. लहान मुलांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत वातावरण भक्तिमय केले. माता तापीच्या जयघोषात शोभायात्रा काढण्यात आली. नदी संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.
दर पौर्णिमेला तापी महाआरतीचा संकल्प
तापी नदीप्रती श्रद्धा आणि संवर्धनाची भावना जपण्यासाठी उपस्थित भाविकांनी दर महिन्याच्या पौर्णिमेला सायंकाळी ६ वाजता तापी मंदिर घाट तसेच महादेव मंदिर परिसरात नियमित तापी महाआरती घेण्याचा संकल्प केला. तसेच तापी नदी व घाट परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी ‘तापी घाट’ संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
या उपक्रमांतर्गत श्रमदानातून स्वच्छता अभियान सातत्याने राबविण्यात येणार असून, नदीचे पावित्र्य आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.
अर्पण केलेली साडी गरजू महिलांना वाटणार
या सोहळ्यातील विशेष आकर्षण म्हणजे माता तापीला अर्पण करण्यात आलेली १०८ मीटर लांबीची साडी. धार्मिक विधीनंतर ही साडी गरजू महिलांना मोफत वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. श्रद्धेचे रूपांतर सामाजिक सेवेत करण्याचा हा उपक्रम उपस्थित भाविकांसाठी प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमास लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, डॉ. रेखा पाटील, प्रभू स्वामी, ह.भ.प. प्रल्हाद ढाके महाराज, नर्मदा व तापी परिक्रमावासी प्रकाश धांडे महाराज, माजी कृषी अधिकारी दिलीप चौधरी, प्रकाश जैस्वाल, शिशिर जावळे, वसंत पाटील (नाशिक), आशिष तिवारी, मंगला पाटील, स्वाती भोळे, प्रभाताई पाटील, प्रा. डॉ. भाग्यश्री भंगाळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तुषार जयस्वाल, महेश पाटील, कैलाससिंह चव्हाण, जयप्रकाश शुक्ला, प्रगती पाटील, नेहा देगलूरकर, वैशाली बराटे, दिलीप टाक, आर. के. कोळी, देवेंद्र वराडे, दिलीप खंडेलवाल, शैलजा पाटील, हितेंद्र कोलते, विनय बेंडाळे, किरण पाटील, सतीश पाटील, विशाल बोरोले, सचिन नेवे यांच्यासह सूर्यकन्या तापी भक्त परिवार, साई निर्मल फाउंडेशन, तिवारी फाउंडेशन, सकल लेवा महिला मंडळ, संत सेवा मंडळ, देवनगर मंडळ, इस्कॉन मंडळ भुसावळ, सुंदरकांड आस्था परिवार, भुसावळ तालुका ज्येष्ठ नागरिक संघ, राधाकृष्ण प्रभात फेरी परिवार, जळगाव महिला भजनी मंडळ, खान्देश आई ग्रुप तसेच विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
धार्मिक परंपरेसोबतच नदी संवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक सेवेला जोड देणारा तापी जन्मोत्सव सोहळा भुसावळकरांसाठी एक प्रेरणादायी उपक्रम ठरला.
