मदिना नगरचा हक्काचा मार्ग अडवला ४८ तासांत कारवाईची नागरिकांची मागणी
साईमत /सावदा /प्रतिनिधी
शहरातील मदिना नगर परिसरातील सार्वजनिक रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गट क्रमांक १२३१ मधून जाणारा नागरिकांच्या वापरातील रस्ता अतिक्रमणामुळे बंद झाल्याचा आरोप करत परिसरातील नागरिकांनी सावदा नगरपरिषद प्रशासनाकडे तक्रार केली आहे. बंद झालेला मार्ग तातडीने खुला करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी करण्यात आली असून, प्रशासनाला ४८ तासांची मुदत देण्यात आली आहे.
मदिना नगर परिसरातील नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित रस्ता महसूल अभिलेखातील ७/१२ उताऱ्यावर तसेच अधिकृत नकाशावर सार्वजनिक वापराचा मार्ग म्हणून नमूद आहे. मात्र, गट क्रमांक १२३१ मधील काही भागावर अतिक्रमण झाल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. परिणामी, परिसरातील नागरिकांना दैनंदिन ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शाळकरी विद्यार्थी आणि नागरिकांना फटका
रस्ता बंद झाल्याने परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अतिरिक्त अंतर पार करावे लागत आहे. डायमंड इंग्लिश स्कूलकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सुमारे एक किलोमीटरचा वळसा घालावा लागत असून, धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या नागरिकांनाही दीड किलोमीटरपर्यंतचा अतिरिक्त प्रवास करावा लागत असल्याचे नागरिकांनी निवेदनात नमूद केले आहे.
मदिना नगर परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असून, या भागातील नागरिकांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगण्यात आले आहे. रस्ता बंद झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि रोजंदारीवर जाणाऱ्या नागरिकांना विशेष त्रास सहन करावा लागत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी नगरपरिषदेची
सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे. नगरपालिका, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम १७९ आणि १८० नुसार नगरपरिषद प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून अतिक्रमण हटवावे तसेच संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांनी आपल्या तक्रारीच्या समर्थनार्थ गट क्रमांक १२३१ व १२३३ चे ७/१२ उतारे, अतिक्रमणाची छायाचित्रे, परिसराचा नकाशा आणि नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन प्रशासनाकडे सादर केले आहे.
प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
या प्रकरणाची माहिती सावदा पोलीस स्टेशन, तहसीलदार रावेर, विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक आणि जिल्हाधिकारी जळगाव यांनाही देण्यात आली आहे. त्यामुळे आता नगरपरिषद प्रशासनाकडून या तक्रारीवर कोणती भूमिका घेतली जाते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, निर्धारित कालावधीत रस्ता खुला करण्यासाठी ठोस पावले उचलली नाहीत, तर माहितीचा अधिकार कायदा तसेच लोकायुक्तांकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
