७ जुलै रोजी झाला होता विवाह; विद्यापीठासमोरील रस्त्यावर भरधाव कारने दुचाकीला उडवले, काका गंभीर जखमी
साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
डोळ्यांत नव्या संसाराची स्वप्ने, हातात लग्नाचा सुडा आणि मनात माहेरच्या माणसांना भेटण्याची ओढ… मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. लग्न होऊन अवघे सहा दिवस उलटले नाहीत तोच, एका नवविवाहितेवर काळाने झडप घातली. माहेरी जात असताना भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत २१ वर्षीय नववधूचा जागीच मृत्यू झाला. हा काळीज पिळवटून टाकणारा अपघात सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासमोरील रस्त्यावर घडला.
वैशाली भाऊसाहेब पाटील (वय २१, रा. कोळपिंप्री, ता. अमळनेर) असे मृत नवविवाहितेचे नाव आहे. या अपघातात तिचे काका गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
६ दिवसांपूर्वीच बांधली होती लग्नगाठ
अमळनेर तालुक्यातील कोळपिंप्री येथील वैशाली यांचा विवाह ७ जुलै रोजी जळगावातील देवराम नगर येथील रहिवासी तथा पोलीस कर्मचारी विजय काशिनाथ पाटील यांच्याशी अत्यंत उत्साहात झाला होता. विवाहानंतर नवदांपत्याने आनंदाने देवदर्शनही केले. लग्नकार्याचे सर्व विधी आटोपल्यानंतर वैशाली यांना पहिल्यांदाच माहेरी (पाचवीला) घेऊन जाण्यासाठी त्यांचे काका सोमवारी जळगावात आले होते. दुपारी जेवण करून दोघेही दुचाकीने आनंदाने कोळपिंप्रीकडे निघाले, मात्र हेच त्यांचे अखेरचे प्रवास ठरले.
मागून आलेल्या ‘त्या’ काळरुपी कारने घात केला!
दोघेही दुचाकीने विद्यापीठासमोरील हायवेवरून जात असताना, मागून आलेल्या एका भरधाव चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, वैशाली या रस्त्यावर फेकल्या गेल्या आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे काका रस्त्याच्या कडेला पडल्याने गंभीर जखमी झाले.
…आणि जिल्हा रुग्णालयात सुटला हंबरडा!
अपघाताची माहिती मिळताच नवऱ्याकडील आणि माहेरच्या नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे धाव घेतली. काही दिवसांपूर्वीच ज्या मुलीला अक्षता टाकून सुखी संसाराचा आशीर्वाद दिला होता, तिचा मृतदेह पाहताच दोन्ही कुटुंबांतील नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. जिल्हा रुग्णालयातील तो करुण देखावा पाहून उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. आनंदाचे वातावरण क्षणार्धात शोकात बदलल्याने कोळपिंप्री आणि जळगावात हळहळ व्यक्त होत आहे.
अज्ञात वाहनचालकाचा शोध सुरू
अपघातानंतर कार चालक वाहनासह फरार झाला असून, पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा आणि चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.
