एसटीचा तांत्रिक बिघाडामुळे महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांचे हाल
साईमत /भुसावळ /प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बससेवेतील तांत्रिक अडचणी आणि देखभालीच्या अभावाचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. फुलगाव उड्डाणपुलाजवळ एकाच ठिकाणी दोन एसटी बसेस अचानक नादुरुस्त झाल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. महामार्गावर सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला.
एसटी महामंडळाकडून प्रवाशांना सुरक्षित आणि वेळेवर सेवा देण्याचे आश्वासन दिले जात असले तरी प्रत्यक्षात जुन्या बसेस, वारंवार होणारे तांत्रिक बिघाड आणि देखभालीतील त्रुटींमुळे प्रवाशांमध्ये नाराजी वाढत आहे. विशेष म्हणजे अलीकडेच एसटीच्या तिकिट दरात वाढ करण्यात आली असतानाही सेवेच्या गुणवत्तेत अपेक्षित सुधारणा होत नसल्याचा सूर प्रवाशांमधून उमटत आहे.
क्लच रॉड बिघाडामुळे धुळे आगाराची बस बंद
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे आगाराची हिरकणी बस क्रमांक एमएच-०६ डब्ल्यू-०११४ ही शेगाव-धुळे मार्गावर धावत होती. ही बस वरणगाव शहराजवळील फुलगाव उड्डाणपुलाखालून महामार्गावरून जात असताना अचानक क्लचच्या रॉडमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे बस रस्त्यातच बंद पडली.
बसचे चालक संजय पाटील यांनी प्रसंगावधान राखत बस सुरक्षित ठिकाणी उभी केली आणि तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. बस बंद पडल्याने त्यातील प्रवाशांना काही काळ रस्त्यावरच थांबावे लागले.
काही वेळातच दुसरी बसही बंद
दरम्यान, त्याच परिसरातून भुसावळ आगाराची एसटी बस क्रमांक एमएच-२० बीएल-१६५८ ही वरणगावहून भुसावळकडे जात असताना एअर प्रेशर यंत्रणेत बिघाड झाल्याने बंद पडली. त्यामुळे एकाच मार्गावर आणि जवळपास एकाच ठिकाणी दोन एसटी बसेस बंद पडल्याने प्रवाशांची मोठी धावपळ उडाली.
या दोन्ही बसेसमधील महिला प्रवासी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच इतर प्रवाशांना बराच वेळ बसची प्रतीक्षा करावी लागली. काही प्रवाशांनी नियोजित कामांना उशीर झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. अखेर एसटी कर्मचाऱ्यांनी पर्यायी बसची व्यवस्था करून प्रवाशांना पुढील प्रवासासाठी रवाना केले.
प्रवाशांचा देखभाल व्यवस्थेवर संताप
भुसावळ आगाराच्या बसच्या दुरुस्तीसाठी आवश्यक साहित्य आणण्यासाठी चालक गेल्याची माहिती मिळाली. मात्र, या घटनेनंतर एसटी महामंडळाच्या देखभाल व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, भुसावळ आणि धुळे आगारातील अनेक बसेस जुन्या झाल्या असून त्यांची नियमित तपासणी व वेळेवर दुरुस्ती होत नसल्याने वारंवार तांत्रिक बिघाडाच्या घटना घडत आहेत. महामार्गावर अचानक बस बंद पडणे हे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.
नियमित तपासणी व नवीन बसेसची मागणी
एसटी महामंडळाने जुन्या बसेसची स्थिती तपासून आवश्यक त्या दुरुस्त्या कराव्यात, नियमित देखभाल प्रक्रिया अधिक प्रभावी करावी तसेच प्रवाशांच्या संख्येनुसार नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
भाडेवाढीनंतर प्रवाशांना अधिक चांगली, सुरक्षित आणि वेळेवर सेवा मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे महामंडळाने केवळ भाडेवाढीवर भर न देता बससेवेचा दर्जा सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
