…तरच ग्रामीण जनतेला न्याय; प्रांताधिकाऱ्यांकडे हरकतीसह निवेदन सादर
साईमत -नशिराबाद- प्रतिनिधी |
जळगाव तालुक्यासाठी मंजूर झालेले अप्पर तहसील कार्यालय जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी न ठेवता, ते नशिराबाद शहरातच स्थापन करण्यात यावे, अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे. यासंदर्भात नशिराबादकरांच्या वतीने जळगाव विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे (प्रांताधिकारी) अधिकृत हरकत आणि सविस्तर निवेदन सादर करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील जनतेला प्रशासकीय सेवा जवळ मिळाव्यात, हाच या कार्यालयाचा मूळ उद्देश असल्याने हे कार्यालय नशिराबादलाच होणे न्याय्य ठरेल, असा दावा करण्यात आला आहे.
नशिराबादचाच दावा का मजबूत?
ऐतिहासिक वारसा व प्रशासकीय महत्त्व: नशिराबादला मोठा ऐतिहासिक वारसा असून ब्रिटिश काळात ते ‘परगणा’ म्हणून ओळखले जायचे. त्या काळात येथे न्यायालयही कार्यरत होते. त्यामुळे या शहराला पूर्वीपासूनच प्रशासकीय व सामाजिक महत्त्व आहे.
मध्यवर्ती ठिकाण आणि दळणवळण सोपे: नशिराबाद हे राष्ट्रीय महामार्गालगत वसलेले आहे. जळगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना तालुक्याच्या इतर गावांपेक्षा नशिराबाद येथे ये-जा करणे अधिक सोयीचे आणि कमी खर्चाचे ठरेल.
नगरपरिषदेकडून जागेची तयारी: अप्पर तहसील कार्यालयासाठी आवश्यक असलेली हक्काची जागा उपलब्ध करून देण्याची तयारी नशिराबाद नगरपरिषदेने दर्शविली आहे. त्यामुळे शासकीय इमारत किंवा कार्यालयासाठी जागेची कोणतीही अडचण येणार नाही.
जळगाव शहराऐवजी नशिराबाद योग्य: ‘अप्पर तहसील’चा मूळ हेतूच मुळात मुख्य शहरावरील ताण कमी करणे आणि ग्रामीण भागाला जवळ प्रशासन देणे हा आहे. त्यामुळे जळगाव शहरातच हे कार्यालय थाटण्याऐवजी तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नशिराबादमध्ये ते सुरू करावे.
गतवैभव आणि विकासाला गती: हे कार्यालय नशिराबादला सुरू झाल्यास या ऐतिहासिक शहराला त्याचे गतवैभव परत मिळण्यास मदत होईल. तसेच संपूर्ण परिसराच्या व्यापारी व सामाजिक विकासाला मोठी चालना मिळेल.
थोडक्यात काय तर…
जळगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांची प्रशासकीय कामे अधिक जलद, सुलभ आणि कमी त्रासाची व्हावीत, यासाठी हे कार्यालय नशिराबाद शहरातच मंजूर करून तातडीने कार्यान्वित करावे, अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आता यावर प्रशासन काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
