शेड, टपऱ्या, हातगाड्या व अनधिकृत बांधकामे हटविली वर्षानुवर्षांच्या अडथळ्यांवर नगरपरिषदेची कारवाई मुख्य रस्ता झाला रुंद
साईमत / फैजपूर /प्रतिनिधी
फैजपूर शहरातील फैजपूर–बऱ्हाणपूर–अंकलेश्वर या प्रमुख मार्गावरील वाढत्या अतिक्रमणामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन नगरपरिषद प्रशासनाने अतिक्रमण हटविण्याची विशेष मोहीम राबविली. या कारवाईमुळे शहरातील प्रमुख रस्ता मोकळा झाला असून वाहनधारक, पादचारी तसेच नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
शहरातील मुख्य मार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर अनधिकृत शेड, दुकानांचे फलक, हातगाड्या, टपऱ्या तसेच रस्त्याच्या हद्दीत आलेले विविध अडथळे निर्माण झाले होते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होण्याबरोबरच पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणेही अवघड झाले होते. या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाने अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली.
नगरपरिषद प्रशासनाने यापूर्वी संबंधित व्यापारी व अतिक्रमणधारकांना स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, सूचना देऊनही अतिक्रमणे कायम राहिल्याने महसूल विभाग आणि पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली. जेसीबी व अन्य यंत्रसामग्रीच्या मदतीने रस्त्यावर आलेले अडथळे हटविण्यात आले. दरम्यान, काही व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वतःहून अतिक्रमण काढून सहकार्य केले.
ही मोहीम यावल रोडवरील राजबाग परिसरापासून सुरू करण्यात आली. त्यानंतर राजबाग, बस स्थानक परिसर, छत्री चौक, सरकारी दवाखाना, सुभाष चौक मार्गे धनाजी नाना महाविद्यालयापर्यंत अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असते. तसेच बस स्थानक, रुग्णालय आणि बाजारपेठ परिसर असल्याने येथे होणाऱ्या गर्दीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता.
बसस्थानक, रुग्णालय परिसरातील कोंडीला मिळाला दिलासा
बस स्थानक परिसर, सरकारी दवाखाना, छत्री चौक आणि सुभाष चौक या ठिकाणी पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते. तसेच या भागात वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. अतिक्रमण हटविल्यामुळे या भागातील रस्ता मोकळा झाला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः शालेय विद्यार्थी, रुग्णवाहिका आणि जड वाहनांच्या वाहतुकीसाठी ही कारवाई उपयुक्त ठरणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.
या कारवाईत मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनाने बंदोबस्त ठेवला.
नगरपरिषद प्रशासनाने नागरिक आणि व्यापाऱ्यांना सार्वजनिक रस्ते, पदपथ तसेच नाल्यांवर अतिक्रमण करू नये, अन्यथा भविष्यातही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. शहरातील प्रमुख रस्ते कायमस्वरूपी अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी अशा मोहिमा नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
