बिल मंजूर करण्यासाठी आणि मोजमाप पुस्तिकेत नोंद करण्यासाठी मागितली होती लाच
दोघा अभियंत्यांवर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
साईमत -चाळीसगाव – प्रतिनिधी |
जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यथार्थ पांडुरंग निनावे आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहायक कुलदिप विरूचंद गमे या दोघांना ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. धुळे एसीबीच्या पथकाने चाळीसगाव येथे रचलेल्या सापळ्यात हे दोन्ही अधिकारी अडकले असून, या कारवाईमुळे शासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
तक्रारदार यांच्या मित्राने पंधराव्या वित्त आयोगांतर्गत रस्ता काँक्रिटीकरण आणि गाव हाडाचे काम केले होते. या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी तसेच मोजमाप पुस्तिकेत (Measurement Book) नोंद करण्यासाठी उपविभागीय अभियंता यथार्थ निनावे आणि सहायक कुलदिप गमे यांनी एकूण बिलाच्या एक टक्का प्रमाणे १० हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) रीतसर तक्रार नोंदवली.
एसीबीचा सापळा आणि कारवाई
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने चाळीसगाव येथे सापळा रचला. तडजोडीअंती ७ हजार रुपये लाच घेण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे लाचेची ७ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना दोन्ही अभियंत्यांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली.
या धडक कारवाईनंतर आरोपी उपविभागीय अभियंता यथार्थ पांडुरंग निनावे आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहायक कुलदिप विरूचंद गमे यांच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
