साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
पाचोरा शहरातील जळगाव-भडगाव रोडवर मध्यरात्रीच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा कार अपघात घडला आहे. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्याशेजारील झाडावर जाऊन आदळली. या भीषण अपघातात जळगाव चौफुली येथील चेतन सुकदेव हटकर (वय २२) या तरुण गमावल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर कारमधील इतर दोन मित्र गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी ७ जुलै रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास (MH 03 AW 9107) क्रमांकाची कार पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील अरिहंत ऑटोमोबाईल्स दुकानासमोरून जात असताना हा अपघात झाला. चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार अत्यंत वेगाने समोर असलेल्या झाडावर जाऊन धडकली. धडक एवढी भीषण होती की कारच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.
घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोश
या अपघातात २२ वर्षीय चेतन हटकर याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात इतर दोन मित्र गंभीर जखमी झाले असून सुदैवाने दोन मित्र सुखरूप बचावले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच मयताच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली. तरुणाचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे मने हेलावून टाकणारा होता.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे पाचोरा शहरासह जळगाव चौफुली परिसरात शोककळा पसरली आहे.
