साईमत -भुसावळ- प्रतिनिधी |
भुसावळ शहर पुन्हा एकदा गोळीबाराच्या थराराने हादरले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोमवारच्या रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दगडी पूल परिसरातील हनुमान मंदिराजवळ एका तरुणावर दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी गावठी कट्ट्यातून बेछूट गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड दहशत पसरली असून शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गोलू रायसिंग पंडित (रा. भुसावळ) असे गोळीबार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
घरासमोरील ओट्यावर असतानाच गाठले!
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोमवारच्या रात्री नेहमीप्रमाणे गोलू पंडित हा आपल्या घरासमोरील ओट्यावर बसलेला होता. परिसरात नागरिकांची वर्दळ सुरू असतानाच अचानक एका दुचाकीवरून दोन अज्ञात इसम त्या ठिकाणी आले. काही समजण्याच्या आतच दुचाकीवरील हल्लेखोरांनी गोलू याच्या दिशेने गावठी कट्टा रोखून कथितरित्या गोळीबार केला. गोळीबाराच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरला. नागरिकांची पळापळ सुरू होताच हल्लेखोर दुचाकीवरून अंधाराचा फायदा घेत पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ परिसराची नाकेबंदी करत तपास चक्रावून फिरवली आहेत. फॉरेन्सिक टीम आणि गुन्हे शाखेच्या पथकाकडून घटनास्थळाची कसून पाहणी सुरू असून पुरावे संकलित करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
‘हे’ प्रश्न अद्याप अनुत्तरित; शहरात उलट-सुलट चर्चा
या खळबळजनक घटनेनंतर भुसावळात चर्चांना उधाण आले आहे:
नेमका वाद कशावरून झाला? गोळीबाराचे मुख्य कारण जुने आर्थिक व्यवहार, वैयक्तिक पूर्ववैमनस्य की गँगवार?
किती राऊंड फायर झाले? हल्लेखोरांनी नेमक्या किती गोळ्या झाडल्या आणि गोलू पंडित या घटनेत गंभीर जखमी झाला आहे का?
हल्लेखोर कोण? भररस्त्यात गोळीबार करण्याचे धाडस करणारे ते ‘शार्प शूटर’ स्थानिक आहेत की बाहेरचे?
घटनेनंतर भुसावळ शहर आणि दगडी पूल परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांकडून परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या संदर्भात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पथके हल्लेखोरांच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमुळे भुसावळातील गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे चित्र असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
