ट्रकच्या मागील चाकाने घेतला बळी वृद्ध महिला ठार
साईमत /जळगाव /प्रतिनिधी
रावेर— बुऱ्हाणपूर–अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंप परिसरात रविवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रक (क्रमांक HP19G0655) पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी प्रवेश करत होता. त्याच वेळी चहा पिऊन परत येत असलेल्या पितांबरबाई शहा बाबुसा शहा (वय ७५) या ट्रकच्या मागील बाजूला आल्या. ट्रक सुरू असल्याचा अंदाज त्यांना न आल्याने त्या अचानक मागील चाकाखाली सापडल्या आणि काही क्षणातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मृत पितांबरबाई शहा या मूळच्या मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील बडवारा येथील रहिवासी होत्या. रोजगाराच्या शोधात त्यांचे संपूर्ण कुटुंब काही दिवसांपूर्वीच रावेर येथे वास्तव्यास आले होते. अत्यंत गरीब परिस्थितीत जीवन जगणाऱ्या या कुटुंबावर अचानक कोसळलेल्या या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते रवी पाटील तसेच भाजपचे पदाधिकारी बाळा आमोदकर यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन मदतकार्य केले. त्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनीही रुग्णालयात भेट देऊन घटनेची माहिती घेतली व पुढील तपासाबाबत सूचना दिल्या.
या भीषण अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पेट्रोल पंप परिसरात जड वाहनांची सतत वर्दळ असताना पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून पुढील कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येत आहे. एका गरीब कुटुंबाचा आधार हिरावल्याने परिसरात शोकभावना व्यक्त होत असून ही घटना सर्वांसाठी अत्यंत वेदनादायक ठरली आहे.
