डोक्यात लोखंडी रॉडचा घाव; रेल्वे कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू
साईमत /भुसावळ /प्रतिनिधी :
शहरातील कवाडे नगर परिसरातील रेल्वे फिल्टर हाऊसमध्ये शनिवारी रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण भुसावळ हादरून गेले आहे. ऑन-ड्युटी असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याचा अज्ञात हल्लेखोराने निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर रेल्वे कर्मचारी व नागरिकांमध्ये तीव्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत कर्मचाऱ्याचे नाव प्रसाद कुळकर्णी असून ते भारंबे नगर परिसरातील रहिवासी होते. ते भुसावळ रेल्वे विभागातील फिल्टर हाऊसमध्ये नियमित ड्युटीवर कार्यरत होते. शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोराने त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने जोरदार वार करून त्यांचा जागीच मृत्यू घडवून आणल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनेनंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला.
घटनेची माहिती मिळताच भुसावळ शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. भुसावळ शहर पोलीस पथकाने पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास विविध अंगांनी सुरू असून अद्याप हत्येमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली असून, जवळपासच्या भागातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीही केली जात आहे. हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी विशेष पथके सक्रिय करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच भुसावळ शहरात घडलेल्या आणखी एका खुनाच्या घटनेमुळे वातावरण आधीच तणावपूर्ण असताना, पुन्हा एकदा ऑन-ड्युटी कर्मचाऱ्याची हत्या झाल्याने कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सतत घडणाऱ्या अशा घटनांमुळे रेल्वे कर्मचारी व कामगार वर्गात भीतीचे सावट पसरले आहे.
रेल्वे कर्मचारी संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. नागरिकांकडूनही शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची मागणी होत आहे. पुढील तपास भुसावळ पोलीस करीत आहेत.
