शेतकऱ्यांना व नागरिकांना वेळेत लाभ मिळावा; प्रशासनाला ठोस सूचना
साईमत /जळगाव / प्रतिनिधी
केंद्र व राज्य शासनाच्या विविध विकास योजनांची अंमलबजावणी वेगाने करून त्यांचा प्रत्यक्ष लाभ सामान्य नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचवावा, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री तथा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा)च्या अध्यक्षा रक्षा खडसे यांनी दिले. जिल्ह्यात सुरू असलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रित समन्वयाने काम करणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीत केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सहभाग घेतला. प्रत्यक्ष उपस्थितीत महापौर दीपमाला काळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, महानगरपालिका आयुक्त आदित्य जीवने, यावलचे उपवनसंरक्षक सौरभ सहाय, तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत अमृत योजनेअंतर्गत जलसंपदा विभागातील सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देत रक्षा खडसे यांनी कामातील विलंब न होता अंमलबजावणी वेगाने करण्यावर भर दिला. महावितरण विभागाने वीजवाहिन्यांवरील केबल चोरीच्या घटनांकडे गंभीर दखल घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
लोडशेडिंगच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना किमान पाच तास नियमित वीजपुरवठा उपलब्ध होईल यासाठी ठोस नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. शेतीसाठी आवश्यक वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीज वितरण यंत्रणेत सुधारणा करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचावा यासाठी कृषी विभागाने प्रभावी समन्वय साधावा, अशा सूचनाही देण्यात आल्या. सरकारी योजना केवळ कागदावर न राहता त्यांचा थेट लाभ नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीत कृषी, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते विकास, राष्ट्रीय महामार्ग, बँकिंग सुविधा, कर्जवाटप, वृक्षारोपण तसेच इतर पायाभूत सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर–जळगाव महामार्गासह जिल्ह्यातील प्रलंबित रस्ते प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला. तसेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय ग्रामीण पाणीपुरवठा योजना, अटल भूजल योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, क्रीडा विभाग, दूरसंचार सुविधा, वन विभागाचे वृक्षारोपण आणि रेल्वे प्रकल्पांच्या भूसंपादन कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीच्या शेवटी सर्व विभागांनी समन्वय राखून विकासकामांची अंमलबजावणी वेगाने, पारदर्शक आणि परिणामकारक पद्धतीने करण्याचे निर्देश देत बैठकीचा समारोप करण्यात आला.
