भयानक वास्तव: धडक इतकी भीषण की ट्रॅक्टरचे झाले दोन तुकडे; मध्यरात्री १ वाजता भडगाव तालुक्यातील घटना
साईमत-भडगाव- प्रतिनिधी|
भडगाव तालुक्यातील कजगावजवळ मध्यरात्री सुमारे एक वाजेच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या आपल्या नातेवाईकांना सोडून अत्यंत आनंदाने घरी परतणाऱ्या भाविकांच्या ट्रॅक्टरला एका भरधाव मालवाहू आयशर वाहनाने पाठीमागून काळ बनून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका भाविकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन महिलांसह १५ जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव परिसरातील काही भाविक आपल्या नातेवाईकांना पंढरपूर वारीसाठी रेल्वे किंवा वाहनात बसवून देण्यासाठी गेले होते. नातेवाईकांना आनंदाने निरोप दिल्यानंतर सर्वजण ट्रॅक्टरने (क्र. उपलब्ध नाही) घराकडे परतत होते. मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास कजगाव शिवारात ट्रॅक्टर आले असताना पाठीमागून आलेल्या एका भरधाव मालवाहू आयशरने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली.
धडक इतकी जबरदस्त की ट्रॅक्टर इंजिनपासून वेगळा झाला!
आयशर वाहनाचा वेग इतका प्रचंड होता की झालेल्या धडकेमुळे ट्रॅक्टरचे अक्षरशः दोन तुकडे झाले. ट्रॅक्टरचे इंजिन आणि ट्रॉली एकमेकांपासून वेगळी होऊन रस्त्याच्या कडेला फेकली गेली. अपघातानंतर मध्यरात्रीच्या शांततेत जखमींचा आणि महिलांचा एकच किंकाळाट सुरू झाला. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच करुण अंत झाला.
