गारबर्डी गावावर शोककळा वीज कोसळून ३५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू
साईमत /भुसावळ/ प्रतिनिधी
रावेर तालुक्यात गेल्या बुधवारपासून दररोज सायंकाळी सुरू असलेल्या दमदार पावसासह वादळी वाऱ्यांनी जनजीवन विस्कळीत केले असून, रविवारी सायंकाळी या बदलत्या हवामानाने पुन्हा एकदा जीवितहानी घडवली. तालुक्यातील गारबर्डी गावात वादळी पावसादरम्यान वीज कोसळून ३५ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
गणेश बल्लू भिल्ल (वय ३५) असे या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी अचानक परिसरात ढग दाटून आले. काही क्षणांतच जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाने वातावरणात प्रचंड गोंधळ निर्माण केला. याचदरम्यान झालेल्या वीज कोसळण्याच्या घटनेत गणेश भिल्ल यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, पोलिस प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले असून वादळी पाऊस व विजांच्या कडकडाटादरम्यान उघड्यावर जाणे टाळावे, झाडाखाली आश्रय घेऊ नये तसेच सुरक्षित ठिकाणी थांबावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
गेल्या बुधवारपासून रावेर तालुक्यात दररोज सायंकाळी वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक भागांत वीजपुरवठा खंडित होणे, झाडे उन्मळून पडणे तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या घटनाही समोर येत आहेत.
या दुर्घटनेमुळे गारबर्डी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. गणेश भिल्ल यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावकऱ्यांनीही या घटनेबाबत तीव्र हळहळ व्यक्त केली आहे.
