डोळ्याखाली गंभीर दुखापत, ₹88 हजारांचे नुकसान
साईमत /भुसावळ/ प्रतिनिधी
सीट न मिळाल्याच्या रागातून रेल्वे टीटीईवर प्राणघातक हल्ला झाल्याची गंभीर घटना भुसावळ रेल्वे स्थानकावर शनिवारी (२७ जून) रात्री घडली. एसी कोचमध्ये जागा उपलब्ध नसल्याचे सांगितल्यानंतर संतप्त झालेल्या प्रवाशाने टीटीईला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. या हल्ल्यात टीटीईच्या डोळ्याखाली गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला असून, सरकारी साहित्य व वैयक्तिक वस्तू मिळून सुमारे ₹88 हजारांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चुन्नीलाल रमेशचंद्र गुप्ता (वय 49), हे भुसावळ येथे हेड टीटीई म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी रात्री नागपूर–मडगाव एक्सप्रेस (गाडी क्रमांक 11203) मध्ये ते भुसावळ ते पनवेल दरम्यान एसी कोच तपासणीचे कर्तव्य बजावत होते. रात्री सुमारे 10.20 वाजता गाडी भुसावळ रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर दाखल झाल्यानंतर आरोपीने एसी कोचमध्ये जागा देण्याची मागणी केली.
मात्र, गाडीत आरएसी प्रवासी असल्याने रिकामी जागा उपलब्ध नसल्याचे टीटीईने स्पष्ट केले. यावरून संतापलेल्या आरोपीने टीटीईला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर टीटीई दुसऱ्या प्रवाशाशी संवाद साधत असताना आरोपीने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. छातीवर, बरगड्यांवर तसेच चेहऱ्यावर जोरदार मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या हल्ल्यात टीटीईच्या डोळ्याखाली गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. तसेच त्यांच्या सरकारी टॅब, चष्मा, ईएफटी बुक आणि सोन्याची साखळी यांचे नुकसान झाले असून एकूण सुमारे ₹88 हजारांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बल (RPF) जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले आणि पुढील कारवाईसाठी लोहमार्ग पोलिसांच्या हवाली केले.
या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 448/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 132, 352, 351(2), 115(2) आणि 324(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार धनराज सुधाकर लुले करीत आहेत.
