१३४ बुथची उभारणी; आरोग्य विभागाची जय्यत तयारी
साईमत /मुक्ताईनगर/ प्रतिनिधी
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियानांतर्गत येत्या रविवार, दि. २८ जून रोजी मुक्ताईनगर तालुक्यात व्यापक स्वरूपात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. शून्य ते पाच वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक ‘दोन थेंब’ देण्याच्या उद्देशाने आरोग्य विभागाने संपूर्ण तालुक्यात जय्यत तयारी केली आहे.
या मोहिमेसाठी तालुका आरोग्य विभागाने एकूण १५,२१५ बालकांचे उद्दिष्ट निश्चित केले असून, प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत लस पोहोचवण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील चारही प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अधिपत्याखाली एकूण १३४ पोलिओ लसीकरण बुथ उभारण्यात आले असून, या बुथवर प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी व स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या मोहिमेत ग्रामीण व शहरी भागातील सर्व गावांचा समावेश करण्यात आला असून, कोणतेही बालक पोलिओ लसीपासून वंचित राहू नये यासाठी घरोघरी जनजागृतीसह विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. आरोग्य विभागाने लसीकरणासाठी आवश्यक औषधसाठा, मनुष्यबळ आणि वाहतूक व्यवस्था पूर्णपणे सज्ज ठेवली आहे.
या संदर्भात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमितकुमार घडेकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “पल्स पोलिओ मोहीम ही बालकांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व पालकांनी आपापल्या शून्य ते पाच वयोगटातील बालकांना नक्कीच पोलिओचे दोन थेंब द्यावेत. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेणे ही सामूहिक जबाबदारी आहे.”
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आशा सेविका, अंगणवाडी सेविका, प्राथमिक आरोग्य कर्मचारी तसेच स्थानिक प्रशासन यांचा समन्वय साधण्यात आला आहे. त्यामुळे रविवारचा दिवस तालुक्यात आरोग्य जनजागृती व लसीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
पोलिओ निर्मूलनाच्या राष्ट्रीय उद्दिष्टाच्या दिशेने मुक्ताईनगर तालुका पुन्हा एकदा सक्रिय सहभाग नोंदवत असून, आरोग्य विभागाने नागरिकांच्या सहकार्याचे आवाहन केले आहे.
