जामन्या परिसरात अवैध छापा वनविभागाची धडक कारवाई २ लाखांचा मुद्देमाल जप्त
साईमत /यावल / प्रतिनिधी :
यावल वन्यजीव अभयारण्यातील जामन्या वन्यजीव वनक्षेत्रात सुरू असलेल्या सागवान तस्करीचा वनविभागाने पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. अवैधरित्या साठवून ठेवलेले सागवान लाकूड जप्त करत सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल वनविभागाने ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी वन कायद्यानुसार संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल वन्यजीव अभयारण्यातील समृद्ध वनसंपदेवर अवैध वृक्षतोड करणाऱ्या टोळीची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर जामन्या वनपरिक्षेत्रात विशेष पथक तयार करून कारवाईचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार वनक्षेत्रात गस्त वाढवण्यात आली होती.
वनपरिक्षेत्र अधिकारी रूपेश दूसाने यांच्या मार्गदर्शनाखाली, उपवनसंरक्षक (वन्यजीव) नाशिक कृष्णा भवर आणि सहायक वनसंरक्षक सत्यजीत निकत यांच्या देखरेखीखाली ही धडक कारवाई करण्यात आली. बुधवारी दुपारी सुरू झालेली ही मोहीम रात्रीपर्यंत सलग सहा तास सुरू राहिली. भर पावसात अतिसंवेदनशील वनक्षेत्रात वनकर्मचाऱ्यांनी कसोशीने शोधमोहीम राबवत मोठ्या प्रमाणात सागवान लाकूड हस्तगत केले.
या कारवाईत सुमारे ६ ते ७ घनमीटर सागवानाचे ४५ ते ५० नग लाकूड जप्त करण्यात आले. बाजारभावानुसार या लाकडाची किंमत अंदाजे दोन लाख रुपये इतकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधितांवर भारतीय वन अधिनियम १९२७ तसेच वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मोहिमेत वनपाल, वनरक्षक तसेच संरक्षण वनमजूर यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत संपूर्ण परिसर पिंजून काढला. वनविभागाच्या या कारवाईमुळे अवैध सागवान तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून पुढील काळात अशा कारवाया अधिक तीव्र केल्या जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
