७,५०० रुपयांची लाच घेताना वनपाल पकडला
साईमत /चाळीसगाव / प्रतिनिधी :
शासकीय योजनांच्या कामांच्या बिलांसाठी लाचखोरीचे प्रकार अद्यापही सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) नाशिक पथकाने बुधवारी चाळीसगाव येथे धाडसी कारवाई करत सामाजिक वनीकरण विभागातील वनपालाला ७ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे शासकीय यंत्रणेत खळबळ उडाली असून सामाजिक वनीकरण विभागातील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्यारेलाल विठ्ठल महाजन (वय ५३) असे असून ते सामाजिक वनीकरण विभाग, परिक्षेत्र चाळीसगाव येथे वनपाल म्हणून कार्यरत आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने मौजे तरवाडे (ता. चाळीसगाव) शिवारातील शेतामध्ये चंदन वृक्ष लागवड व संवर्धनासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अर्ज केला होता. हा अर्ज मंजूर होऊन तीन वर्षांच्या कालावधीसाठी तब्बल ४ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.
योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कामाचे कुशल कामगारांचे बिल सादर करण्यात आले होते. त्यातील ५० हजार रुपयांचे देयक मंजूर करून काढण्यासाठी आरोपी वनपालाने तक्रारदाराकडे ७ हजार ५०० रुपयांची लाच मागितली होती. ही रक्कम संबंधित बिलाच्या सुमारे १५ टक्के असल्याचे तपासात समोर आले आहे.
तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर विभागाने पडताळणी केली. पंच साक्षीदारांसमक्ष २४ जून २०२६ रोजी आरोपीने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. त्यानुसार आरोपी प्यारेलाल महाजन यांनी तक्रारदाराकडून ७ हजार ५०० रुपयांची रक्कम स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक श्रीमती नेहा सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस हवालदार विनोद चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल अनिल गांगोडे तसेच पोलीस शिपाई योगेश शिंदे यांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत नागरे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव) करीत आहेत.
या घटनेची नोंद चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात करण्यात येत असून आरोपी लोकसेवकाविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ मधील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी लाच मागितल्यास त्याची तात्काळ माहिती विभागाला द्यावी. भ्रष्टाचाराविरोधातील लढ्यात नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन विभागाने केले आहे. या कारवाईनंतर सामाजिक वनीकरण विभागातील इतर कामकाजाचीही चौकशी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
