वारकऱ्यांनी अभंग, भजन आणि नामस्मरण करत भक्तिमय वातावरण निर्माण केले
साईमत /मुक्ताईनगर/ प्रतिनिधी :
आषाढी वारीच्या पवित्र सोहळ्यानिमित्त आदिशक्ती संत मुक्ताबाई यांची पालखी आज मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. टाळ-मृदंगांचा गजर आणि “ज्ञानोबा माऊली–तुकाराम” तसेच “संत मुक्ताबाई” यांच्या जयघोषाने संपूर्ण मुक्ताईनगर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.
पालखी प्रस्थानापूर्वी संत मुक्ताबाई मंदिर परिसरात पारंपरिक पद्धतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी संत मुक्ताबाईंच्या चरणी नतमस्तक होत महाआरतीत सहभाग घेतला.
वारकऱ्यांच्या उपस्थितीत अभंग, भजन आणि नामस्मरणाचा गजर सुरू होता. टाळ-मृदंगांच्या तालावर वारकऱ्यांनी फेर धरत संपूर्ण परिसर भक्तिमय करून टाकला. अनेक वर्षांची अखंड परंपरा जपत हा पालखी सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला.
विशेष म्हणजे, पालखी प्रस्थानाच्या दिवशी परिसरात हलक्या रिमझिम पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे सोहळ्याच्या आनंदात अधिकच भर पडली असून, वारकऱ्यांनी त्याला संत मुक्ताबाईंचा आशीर्वाद मानत समाधान व्यक्त केले.
पालखी मार्गावरील गावांमध्ये वारकऱ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी ही पालखी भक्तिभावाने मार्गस्थ झाली असून, संपूर्ण प्रवासात भक्तीचा गजर कायम राहणार आहे.
