साईमत -चाळीसगाव -प्रतिनिधी |
चाळीसगाव शहर आणि तालुका परिसरात गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी मध्यरात्री एकाच वेळी धडक ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवले. पोलीस दलाच्या प्रचंड फौजफाट्यासह पहाटे २ ते सकाळी ७ वाजेपर्यंत चाललेल्या या अत्यंत गोपनीय आणि धडक कारवाईत तब्बल ४४ सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरात गुन्हेगारी विश्वात प्रचंड खळबळ उडाली आहे.
या विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांनी अनेक बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई केली. यामध्ये प्रामुख्याने:
शस्त्र जप्त: एका संशयिताकडून प्राणघातक शस्त्र जप्त करत त्याच्यावर शस्त्र कायद्यांतर्गत (Arms Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहने जप्त: कर्जासाठी भाड्याने देऊन अन्यत्र बेकायदेशीरपणे गहाण ठेवण्यात आलेली ३ वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.
हातभट्टीवर कारवाई: कारवाई दरम्यान पोलिसांनी तब्बल ६० लिटर गावठी दारू शोधून काढून ती जागीच नष्ट केली.
चाळीसगाव पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि राज्य राखीव दलाच्या (RCP) तीन प्लाटूनसह मोठ्या पोलीस फौजफाट्याने चाळीसगाव शहर व तालुक्यात एकाच वेळी विविध ठिकाणी छापे टाकले. सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे आणि त्यांच्या सध्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.
अशोक नखाते (अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव विभाग) यांची प्रतिक्रिया
“चाळीसगाव शहर आणि परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी हे कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले. पहाटेपर्यंत चाललेल्या या कारवाईत ४४ सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीविरुद्ध पोलिसांची अशीच कडक मोहीम यापुढेही सुरू राहील.”
