भक्तिभावाची लाट उसळली; मुक्ताईनगरात वारकऱ्यांची गर्दी वाढली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती
साईमत /मुक्ताईनगर/ प्रतिनिधी :
मुक्ताईनगर येथे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर भक्तिभाव, हरिनामाचा गजर आणि वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. राज्यातील लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या संत मुक्ताईंच्या पालखी सोहळ्याचे उद्या पंढरपूरकडे विधिवत प्रस्थान होणार असून संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही संत मुक्ताईंची पालखी विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूर कडे मार्गस्थ होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी मंदिर प्रशासन, स्थानिक प्रशासन आणि वारकरी संप्रदायाने जोरदार तयारी केली आहे. शहरातील प्रमुख मार्ग, मंदिर परिसर तसेच पालखी मार्गावर आकर्षक विद्युत रोषणाई, पताका आणि स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत.
संत मुक्ताई मंदिर परिसरात पहाटेपासूनच हरिनामाचा अखंड गजर सुरू असून भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भारावून गेले आहे. राज्यभरातून आलेल्या वारकरी दिंड्यांचे मुक्ताईनगरमध्ये आगमन होत असून “जय मुक्ताई माऊली” आणि “विठ्ठल विठ्ठल”च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे.
यंदाच्या पालखी प्रस्थान सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती. त्यांच्या हस्ते पालखीचे विधिवत पूजन होणार असून त्यानंतर पारंपरिक पद्धतीने पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कडक सुरक्षा व्यवस्था आणि व्यापक नियोजन करण्यात आले आहे.
वारकऱ्यांच्या सोयीसाठी पिण्याचे शुद्ध पाणी, तात्पुरती निवास व्यवस्था, आरोग्य सेवा केंद्रे आणि वाहतूक नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे.
शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला हा संत मुक्ताई पालखी सोहळा वारकरी संप्रदायासाठी अत्यंत श्रद्धेचा आणि भावनेचा विषय मानला जातो. भक्ती, समता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देत ही पालखी उद्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार असून संपूर्ण राज्याचे लक्ष या पवित्र सोहळ्याकडे लागले आहे.
