मुंबई:
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून, आजचा दिवस प्रचंड गदारोळाचा ठरण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आणि पुरवणी मागण्या सादर झाल्यानंतर, आज विरोधक विविध आक्रमक मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरण्याच्या तयारीत आहेत.
या मुद्द्यांवरून सभागृहात खडाजंगीची शक्यता
शेतकरी आणि दुष्काळाचा प्रश्न: राज्यातील दुष्काळ, तीव्र पाणीटंचाई, शेतकर्यांचे विविध प्रश्न आणि वीजटंचाई यावरून विरोधक महायुती सरकारला घेरतील.
राजकीय घडामोडी व ‘ऑपरेशन टायगर’: शिवसेना (ठाकरे गट) आणि शिंदे गटातील राजकीय संघर्ष, सहा खासदारांच्या पक्षांतराचा गाजणारा मुद्दा आणि ‘ऑपरेशन टायगर’वरून सभागृहात जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
पहिल्याच दिवशी मोठी घोषणा: शेतकर्यांच्या कर्जमुक्तीसाठी २०,५५२ कोटी!
पहिल्या दिवशी राज्य सरकारने दोन्ही सभागृहांत १७,७०६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. यामध्ये ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी आणि शेतकर्यांना मोठा दिलासा देण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ ची घोषणा करण्यात आली असून, त्यासाठी तब्बल २०,५५२ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या आर्थिक तरतुदी
अंगणवाडी कर्मचारी: मानधन आणि वेतनासाठी १,७३४ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी.
विद्यार्थी शिष्यवृत्ती: विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी ५०० कोटी रुपये.
सहकारी साखर कारखाने: आर्थिक अडचणीत सापडलेल्या कारखान्यांना बाहेर काढण्यासाठी ४८३ कोटी रुपये मंजूर.
संजय गांधी निराधार योजना: दिव्यांग व निराधार घटकांसाठी ८७४ कोटी रुपयांची तरतूद.
सुरक्षा व्यवस्थेसाठी कोट्यवधींचा ‘बूस्टर डोस’
गृह विभाग आणि सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने बजेटमध्ये महत्त्वपूर्ण तरतुदी केल्या आहेत:
नागपूर विधानभवन विस्तार: १०० कोटी रुपये.
नवीन कारागृह बांधकाम: २०० कोटी रुपये.
सागरी पोलिस प्रशिक्षण: ३८२ कोटी रुपये.
सायबर गुन्हे जनजागृती: २० कोटी रुपये.
CCTNS प्रकल्प: ५० कोटी रुपये निश्चित.
एकीकडे सरकार महत्त्वाच्या विधेयकांद्वारे आपली बाजू भक्कम करत असताना, दुसरीकडे विरोधकही तितकेच आक्रमक भूमिकेत असल्याने आजचे कामकाज वादळी ठरणार हे नक्की!
