होर्डिंग्ज टाळून समाजसेवा वह्या-दप्तर वाटपाचा भव्य कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
साईमत /जळगाव/ प्रतिनिधी
जळगाव शहरातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देण्याच्या उद्देशाने जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत तब्बल १००० विद्यार्थ्यांना वह्या व दप्तरांचे वाटप करण्यात आले. कोणत्याही प्रकारची जाहिरातबाजी टाळून केवळ समाजसेवेच्या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
आमदार सुरेश दामू भोळे यांनी यंदा आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. होर्डिंग्ज, बॅनरबाजी टाळून त्या ऐवजी गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा त्यांनी दिलेला संदेश प्रत्यक्षात उतरविण्यात आला. त्यांच्या आवाहनाला भाजपच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत एकूण १००० वह्यांचे संकलन केले.
या उपक्रमाचा भव्य कार्यक्रम रविवार, २१ जून रोजी सकाळी १० वाजता जळगाव शहरातील सरदार वल्लभभाई पटेल भवन येथे पार पडला. या वेळी जळगाव महानगरपालिकेच्या गरजू विद्यार्थ्यांना वह्या व दप्तरांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, खासदार स्मिताताई वाघ, महापौर दिपमाला काळे, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील,तसेच भाजप प्रदेश सदस्य संतोष इंगळे यांच्यासह अनेक नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देत अशा सामाजिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमाचे संयोजन मिलिंद गोविंद चौधरी व उदय भालेराव यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजप सरचिटणीस विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, नितीन इंगळे, जयेश भावसार, प्रकाश पंडित, मंडळ अध्यक्ष आनंद सपकाळे, अजित राणे, विनोद मराठे, अतुल बारी यांच्यासह विविध आघाडींच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला शहरातील शेकडो विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांच्या हातात वह्या व दप्तर मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात आमदार सुरेश दामू भोळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
