साईमत -जळगाव -प्रतिनिधी |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना’ अंतर्गत देशभरातील लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे २,४०० कोटी रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानाचे वितरण करण्यात आले. दिल्ली येथील विज्ञान भवनातून झालेल्या या राष्ट्रीय कार्यक्रमाचे देशभरातील २०० ठिकाणी थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. जळगावात जैन हिल्स येथील ‘गांधी तीर्थ’च्या कस्तुरबा सभागृहात या विशेष ऑनलाईन कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
नाशिक विभागीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त-१ अतुल कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात जिल्ह्यातील नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.
गांधी तीर्थ येथील कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. या प्रसंगी जळगावच्या खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, भविष्य निर्वाह निधी आयुक्त-२ मनोज कोळी, भविष्य निर्वाह निधी सहाय्यक आयुक्त मोहित दीक्षित, जळगाव पीएफ कार्यालयाचे दीपक चौधरी तसेच जिल्ह्यातील विविध उद्योगांचे प्रतिनिधी, नियोक्ते आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिल्ली येथील मुख्य कार्यक्रमाला केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री डॉ. मनसुखमांडविया आणि श्रम व रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
रोजगारनिर्मितीला राष्ट्रीय चळवळीचे स्वरूप: पंतप्रधान नरेंद्र मोदी
दूरदृश्य प्रणालीद्वारे देशभरातील २०० हून अधिक केंद्रांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचे महत्त्व अधोरेखित केले.
“ही योजना केवळ रोजगार उपलब्ध करून देणारी नसून, पहिल्यांदाच नोकरीत प्रवेश करणाऱ्या युवकांच्या आकांक्षांना बळ देणारी आहे. उद्योगक्षेत्र आणि कार्यबल (Workforce) यांच्यात मजबूत दुवा निर्माण करणारी ही योजना कर्मचारी आणि नियोक्ता (मालक) या दोघांनाही एकाच वेळी प्रोत्साहन देते. रोजगारनिर्मितीला राष्ट्रीय चळवळीचे स्वरूप देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे,” असे पंतप्रधानांनी नमूद केले.
देशात ७० लाख नवीन रोजगार; २० लाख युवकांचा ६ महिन्यांचा टप्पा पूर्ण
योजनेच्या यशाची आकडेवारी मांडताना पंतप्रधानांनी सांगितले की, आतापर्यंत देशात सुमारे ७० लाख नवीन रोजगार निर्माण झाले असून, या प्रथमच नोकरी मिळालेल्या युवकांना सामाजिक सुरक्षा व्यवस्थेच्या (PF कक्षेत) आणण्यात आले आहे. त्यापैकी सुमारे २० लाख युवकांनी पहिल्या नोकरीतील ६ महिन्यांचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे, तर जवळपास १० लाख लाभार्थ्यांना प्रोत्साहनपर अनुदान वितरित करण्यात आले आहे. आतापर्यंत २,००० कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाली असून, हा युवकांच्या परिश्रमाचा सन्मान असल्याचे ते म्हणाले.
खासदार स्मिता वाघ: विकसित भारत रोजगार योजनेमागील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दूरदृष्टीपूर्ण दृष्टिकोन स्पष्ट करत ही योजना देशातील युवाशक्तीला दिशा देणारी असल्याचे सांगितले.
आमदार राजूमामा भोळे: जळगाव जिल्ह्यातील तरुणांना या योजनेचा मोठा फायदा होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
अशोक जैन (अध्यक्ष, जैन इरिगेशन): उद्योग क्षेत्राच्या वतीने आपल्या भावना व्यक्त करत, यामुळे उद्योग आणि कुशल मनुष्यबळ यात चांगला ताळमेळ बसेल असा विश्वास दर्शवला.
मनोज कोळी (भविष्य निर्वाह निधी आयुक्त-२): त्यांनी उपस्थित तरुणांना भविष्य निर्वाह निधी (PF) योजनेची सविस्तर तांत्रिक माहिती आणि त्याचे फायदे समजावून सांगितले.
कार्यक्रमात लाभार्थी कर्मचारी पूजा धनगर आणि नियोक्ते प्रमोद पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. जैन इरिगेशनचे ज्ञानेश्वर शेंडे आणि नितीन चोपडा यांनी कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन केले. अखेर जैन इरिगेशनमध्ये नव्याने रुजू झालेल्या १० सहकाऱ्यांसह विविध संस्थांमधील कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.
