ठाकरे गटाला खिंडार: ६ खासदार शिंदे गटाच्या वाटेवर; वर्धापनदिनी गोरेगावच्या ‘नेस्को’त होणार मेगा प्रवेश?
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ९ पैकी ६ लोकसभा खासदार गुरुवारी पक्षाच्या अत्यंत महत्त्वाच्या संसदीय बैठकीला गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या सर्व खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत शिंदे गटात विलीन होण्याचे संकेत दिले आहेत. हा ठाकरे गटासाठी अत्यंत मोठा धक्का मानला जात असून, आता संपूर्ण देशाचे लक्ष लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निर्णयाकडे लागले आहे.
बैठकीला दांडी मारणारे ‘ते’ ६ खासदार कोण?
गुरुवारी मुंबईत झालेल्या ठाकरे गटाच्या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, राजभाऊ वाजे आणि राज्यसभा खासदार संजय राऊत हेच केवळ उपस्थित होते. तर खालील ६ प्रमुख खासदारांनी या बैठकीला दांडी मारली. नागेश अष्टिकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दीना पाटील ,ओमप्रकाश राजेनिंबाळकर ,(यांच्या घरवापसीचीही जोरदार चर्चा आहे). भाऊसाहेब वाकचौरे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या ६ बंडखोर खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन होण्याच्या पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या असून, हे पत्र लोकसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आले आहे. सध्या या स्वाक्षऱ्यांची कायदेशीर पडताळणी सुरू असून, खासदारांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेश दिले जाऊ शकतात.
‘व्हीप’च्या कायदेशीर लढाईला तोंड फुटणार?
बंडखोरीची कुणकुण लागताच ठाकरे गटाने बुधवारीच आपल्या सर्व खासदारांना गुरुवारी सकाळी ११ वाजता उपस्थित राहण्यासाठी ‘थ्री-लाईन व्हीप’ जारी केला होता. गैरहजर राहणाऱ्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याचा पक्षाचा मानस आहे.
ठाकरे गटाचा दावा (अरविंद सावंत): “पक्षप्रमुखांशी चर्चा करून व्हीपचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.”
शिंदे गटाचा प्रतिदावा: “हा व्हीप अंतर्गत सभेसाठी होता, सभागृहाच्या कामकाजासाठी नाही. पक्षांतरबंदी कायद्यानुसार (१०वी अनुसूची) सभागृहाबाहेरील व्हीपचे उल्लंघन केल्यास अपात्रतेची कारवाई होऊ शकत नाही.”
तसेच पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई टाळण्यासाठी किमान दोन-तृतीयांश (२/३) म्हणजेच ९ पैकी ६ खासदारांची आवश्यकता असते, जी संख्या बंडखोरांनी गाठली आहे.
दिल्ली ते जयपूर… आणि आता मुंबईच्या ‘वेस्टीन’मध्ये मुक्काम!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आखलेले ‘ऑपरेशन टायगर’ आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. दिल्लीच्या ‘लीला हॉटेल’मधून या ६ खासदारांना थेट राजस्थानच्या जयपूरला हलवण्यात आले होते. १८ जूनच्या संध्याकाळी हे सर्व खासदार मुंबईत दाखल झाले असून, गोरेगाव येथील प्रसिद्ध ‘वेस्टीन हॉटेल’मध्ये त्यांची कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत राहण्याची सोय करण्यात आली आहे.
१९ जून: वर्धापनदिनाचा मुहूर्त आणि ठाकरेंची तातडीची बैठक
योगायोग असा की, १९ जून रोजी गोरेगावच्या ‘नेस्को’ (NESCO) सेंटरमध्ये शिवसेना (शिंदे गट) पक्षाचा भव्य वर्धापन दिन सोहळा पार पडत आहे. याच सोहळ्यात हे ६ बंडखोर खासदार जाहीरपणे शिंदे गटात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे.
दुसरीकडे, आपली बाजू सावरण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (१९ जून) दुपारी १२ वाजता ‘मातोश्री’ निवासस्थानी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. यामध्ये प्रामुख्याने ईशान्य मुंबईतील पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली जाणार आहेत.
कायद्याचा पेच: ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई आणि संजय राऊत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन बेकायदेशीर पक्षांतर रोखण्याची मागणी केली आहे. “दोन-तृतीयांश खासदारांचा पाठिंबा असला तरी मूळ पक्ष विलीन झाल्याशिवाय खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकत नाहीत,” असा दावा देसाई यांनी केला आहे. त्यामुळे आता अंतिम चेंडू लोकसभा अध्यक्षांच्या कोर्टात आहे.
