साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
पंतप्रधान आवास योजनेतून घर मंजूर झालंय, पण अजूनही बांधकाम रडत-खडत सुरू आहे? तर मग आता सावधान! कारण जळगाव जिल्हा परिषदेच्या धडाकेबाज मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) करिश्मा नायर यांनी आता थेट ‘ॲक्शन मोड’ ऑन केला आहे. जिल्ह्यातील एकही पात्र लाभार्थी हक्काच्या घरापासून वंचित राहू नये, यासाठी त्यांनी थेट लाभार्थ्यांच्या घरांवर धडक देण्याची धडाकेबाज मोहीम हाती घेतली आहे!
आकडा वाचून थक्क व्हाल!
पंतप्रधान आवास योजना टप्पा-१ अंतर्गत जिल्ह्यात तब्बल 76,754 घरकुलांना मंजुरी मिळाली होती. त्यापैकी बहुतांश घरं चकाचक तयार झाली आहेत, पण… अजूनही 5,949 घरकुलं अपूर्ण अवस्थेत लटकलेली आहेत. हाच प्रलंबित आकडा संपवण्यासाठी आता प्रशासनाने कंबर कसली आहे.केवळ एसी केबिनमध्ये बसून आदेश सोडण्यापेक्षा थेट मैदानात उतरून काम करण्यावर सीईओ करिश्मा नायर यांचा भर आहे. याच मोहिमेअंतर्गत त्यांनी यावल तालुक्यातील डांभूर्णी आणि धरणगाव तालुक्यातील नांदेड येथे अचानक भेटी दिल्या.
तिथे जाऊन त्यांनी नुसती पाहणी केली नाही, तर लाभार्थ्यांशी थेट संवाद साधला. “अडचण काय आहे भाऊ?” असं विचारत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि प्रलंबित बांधकाम तातडीने पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिले.ज्या लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला, दुसरा किंवा तिसरा हप्ता मिळाला आहे, त्यांनी पैशांचा योग्य वापर करून घराचं काम तात्काळ पूर्ण करावं, असं आवाहन सीईओ करिश्मा नायर यांनी केलं आहे. तसेच अधिकाऱ्यांनीही लाभार्थ्यांच्या पाठीशी राहून त्यांना मदत करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
