स्वप्नं अर्धवट सोडून गेला गोलू;रात्रपाळीवरून परतताना काळाचा घाला वरणगाव फॅक्टरीत शोक
साईमत/भुसावळ/ प्रतिनिधी
पुणे–शिक्रापूर मार्गावर झालेल्या भीषण अपघाताने भुसावळ तालुक्यातील वरणगाव फॅक्टरी परिसरावर शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेत राजरत्न उर्फ गोलू आनंद कडू सुरवाडे (वय २४, रा. वरणगाव फॅक्टरी) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांचा मित्र गौरव इंगळे गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राजरत्न सुरवाडे आणि गौरव इंगळे हे दोघेही भुसावळ तालुक्यातील वरणगाव फॅक्टरी परिसरातील रहिवासी असून पुणे शहरातील एका खासगी कंपनीत नोकरी करत होते. बुधवारी पहाटे सुमारे ४.३० वाजता रात्रपाळीचे काम संपवून ते मोटारसायकलने आपल्या राहत्या खोलीकडे परतत असताना शिक्रापूर परिसरात त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला.
अपघात इतका भीषण होता की राजरत्न सुरवाडे यांना गंभीर दुखापत झाली आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. तर गौरव इंगळे यांना गंभीर अवस्थेत तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी स्थानिक प्रशासनाकडून पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
राजरत्न सुरवाडे हे अत्यंत मनमिळावू, कष्टाळू आणि मदतीला तत्पर असा स्वभाव असलेले युवक म्हणून परिचित होते. कुटुंबाच्या आर्थिक जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी ते पुण्यात नोकरी करत होते. त्यांच्या अकाली निधनाची बातमी कळताच कुटुंबीय, मित्रपरिवार आणि वरणगाव फॅक्टरी परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला.
त्यांच्या पश्चात आई, वडील आणि एक भाऊ असा परिवार असून घरातील कर्त्या तरुणाचा असा अचानक झालेला मृत्यू कुटुंबासाठी मोठा आघात ठरला आहे. संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी पुण्याकडे धाव घेतली. या दुर्दैवी घटनेमुळे वरणगाव फॅक्टरी परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले असून राजरत्न सुरवाडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. तसेच गौरव इंगळे यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना नागरिकांकडून केली जात आहे.
या घटनेने एक होतकरू आणि कर्तबगार तरुण काळाच्या पडद्याआड गेला असून संपूर्ण परिसरावर दुःखाची छाया पसरली आहे.
