ठाकरे गटाला मोठा धक्का? सहा खासदार शिंदे गटाच्या संपर्कात
साईमत/मुंबई / प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अंतर्गत घडामोडींना वेग आला असून पक्षातील सहा खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात अस्वस्थता वाढली असून आगामी काळात पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील काही खासदार नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर खासदारांची बैठक घेतली होती. या बैठकीला सर्व खासदार उपस्थित राहिले नसल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते. पक्षातील काही लोकप्रतिनिधींच्या भूमिकेबाबत त्याचवेळी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
मंगळवारी ठाकरे गटातील सहा खासदार दिल्लीत दाखल झाल्याची माहिती समोर आल्यानंतर या चर्चांना अधिक बळ मिळाले. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत पक्षातील परिस्थितीवर भाष्य केले. त्यांनी काही खासदारांनी पक्षनिष्ठेची शपथ मोडल्याचा आरोप करत त्यांच्यावर टीका केली. तसेच संबंधित खासदारांना पक्षाकडून व्हीप जारी करण्यात आल्याची माहितीही दिली.
राऊत यांनी यावेळी गंभीर आरोप करत काही खासदारांना आर्थिक प्रलोभने दाखवून पक्ष सोडण्यास प्रवृत्त करण्यात आल्याचा दावा केला. पक्षात फूट पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात दबाव आणि आमिषांचा वापर होत असल्याचे त्यांनी म्हटले.
सूत्रांच्या माहितीनुसार, परभणीचे संजय जाधव, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, यवतमाळ-वाशीमचे संजय देशमुख, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे आणि उत्तर-पूर्व मुंबईचे संजय दिना पाटील हे खासदार नव्या राजकीय भूमिकेच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत संबंधित खासदारांकडून अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही.
दुसरीकडे, अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे तीन खासदार ठाकरे गटासोबत कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे. संभाव्य बंडखोर खासदार लवकरच लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट करू शकतात, अशी माहिती राजकीय सूत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान, १८ जून रोजी दिल्लीत ठाकरे गटाची महत्त्वपूर्ण बैठक होणार असून या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खासदारांशी संवाद साधणार आहेत. पक्षातील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करून पुढील रणनीती निश्चित केली जाणार असल्याचे समजते.
या सर्व घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली असून शिवसेनेतील राजकीय संघर्ष नव्या टप्प्यात पोहोचल्याची चर्चा सुरू झाली आहे. आगामी काही दिवसांत या प्रकरणावरून महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
