वाद मिटला, पण राग नाही; रात्री घरावर हल्ला करून दहशत 15 ते 20 जणांच्या टोळक्याचा हल्ला; एरंडोलमध्ये खळबळ
साईमत/एरंडोल/ प्रतिनिधी
शहरातील गांधीपुरा परिसरात किरकोळ वादाचे मंगळवारी रात्री हिंसक रूपांतर झाल्याने एकच खळबळ उडाली. सुमारे 15 ते 20 जणांच्या टोळक्याने एका घरावर हल्ला चढवत दगडफेक, मारहाण आणि तोडफोड केल्याची घटना घडली. या प्रकरणी 16 संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमराज यशवंत पाटील आणि आरिफ शेख माजीद शेख यांच्यात मंगळवारी सायंकाळी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. शहरातील काही मान्यवरांनी हस्तक्षेप करून हा वाद तात्पुरता मिटविला होता. मात्र, रात्री सुमारे आठ वाजेच्या सुमारास वादाचे पडसाद उमटले आणि आरिफ शेख याच्यासह युवकांच्या एका टोळक्याने प्रेमराज पाटील यांच्या गांधीपुरा येथील घरावर धडक मारली.
हल्लेखोरांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरावर दगडफेक करत साहित्याची नासधूस करण्यात आली. घराबाहेर उभी असलेली मोटारसायकलही फोडण्यात आली. या गोंधळात घरातील मीनाबाई लक्ष्मण पाटील, महेंद्र पाटील, माधुरी पाटील आणि स्वाती प्रेमराज पाटील यांना मारहाण झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी मीनाबाई लक्ष्मण पाटील यांच्या फिर्यादीवरून आरिफ शेख माजीद शेख, मुन्ना शेख अन्वर, इरफान शेख उर्फ गोळ्या, फारुख मिस्तरी, राजू पिंजारी, इम्रान उर्फ चाटी, फिरोज मिस्तरी, आसिफ शेख फावड्या, सलीम शेख मुख्तार, तौफिक मुजावर, भुरा शेख अब्दुल, अब्बास शेख अब्दुल, मोबीन युनुस शेख, अज्जू भंगारवाले यांच्यासह एकूण 16 संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरिफ शेख माजीद शेख, आसिफ शेख जब्बार शेख, अब्बास शेख अब्दुल शेख आणि इरफान शेख उर्फ गोल्या रईस शेख या चार संशयितांना अटक केली. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून त्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
घटनेनंतर गांधीपुरा परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. धरणगावचे पोलीस निरीक्षक सुनील पवार, पारोळ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिसरात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. अमळनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांनीही रात्रभर शहरात मुक्काम करून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले.
बुधवारी सकाळी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
