साईमत -चाळीसगाव- प्रतिनिधी |
चाळीसगाव शहरात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ३ वेगवेगळ्या मोटारसायकली जप्त केल्या असून दोन मुख्य आरोपींसह एका संशयित इसमाला ताब्यात घेतले आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ५ हजार रुपये आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे मुख्य आरोपी जेरबंद
१४ जून २०२६ रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना, पथकाला एक गोपनीय माहिती मिळाली. चाळीसगाव येथील हनुमानसिंग नगरचा रहिवासी राहुल सुभाष भिसे याने ‘एचएफ डिलक्स’ मोटारसायकल चोरी केल्याचे समोर आले.
पोलिसांनी सापळा रचून राहुल भिसे याला ताब्यात घेतले, तेव्हा त्याच्याकडे एक ‘हौंडा युनिकॉर्न’ मोटारसायकल आढळली. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने चोरलेली ‘एचएफ डिलक्स’ गाडी चाळीसगावच्याच हरिगिरी बाबा नगरमधील प्रशांत दीपक राजपूत याला २०,००0 रुपयांत विकल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्वरित प्रशांत राजपूत यालाही ताब्यात घेतले. या दोघांकडून ८०,००० रुपये किमतीच्या दोन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
दुसऱ्या एका कारवाईत, एलसीबीचे पथक १४ जून रोजी चाळीसगाव शहरातील अहिल्याबाई होळकर चौक परिसरात गुन्हेगार वॉच पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, विना नंबर प्लेटच्या गाडीवरून संशयास्पद रित्या फिरणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी थांबवले.
त्याची चौकशी केली असता, त्याने आपले नाव प्रशांत दत्तात्रय राठोड (वय २७, रा. यशवंतनगर रोड, चाळीसगाव) असे सांगितले. गाडीच्या कागदपत्रांबाबत त्याने समाधानकारक उत्तरे न दिल्याने पोलिसांनी त्याच्या ताब्यातील २५,००० रुपये किमतीची ‘यामाहा एफझेड’ (Yamaha FZ) मोटारसायकल जप्त केली असून त्यालाही पुढील कारवाईसाठी चाळीसगाव पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
ही धडक कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते (चाळीसगाव परिमंडळ), आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पोहेकॉ लक्ष्मण पाटील, पोकॉ राहुल पाटील, आणि पोकॉ भूषण पाटील यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. आरोपींना पुढील तपासासाठी चाळीसगाव शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
