दामिनी पथकाकडून विद्यार्थिनींना दिले सुरक्षिततेचे धडे
साईमत/भुसावळ/ प्रतिनिधी
जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या ‘विद्यार्थी सुरक्षा उपक्रम’ अंतर्गत भुसावळ शहरात दामिनी पथकाने सोमवारी शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी विशेष गस्त मोहीम राबवून विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेवर भर दिला. नव्या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सुरक्षित शैक्षणिक वातावरण मिळावे, या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली.
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. दामिनी पथकाने शहरातील विविध शाळा–महाविद्यालये, मुख्य बसस्थानक आणि रिक्षा थांबे परिसरात अचानक भेटी देत प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. या कारवाईमुळे परिसरात टवाळखोर आणि रोडरोमिओंमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
या मोहिमेदरम्यान पोलिसांनी केवळ गस्त न घालता विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक काळे आणि त्यांच्या पथकाने शाळा व महाविद्यालयांमध्ये उपस्थित राहून विद्यार्थिनींशी चर्चा केली. प्रवासादरम्यान किंवा शाळा परिसरात छेडछाड, पाठलाग अथवा मानसिक त्रास अशा घटना घडतात का, याबाबत विद्यार्थ्यांकडून माहिती घेण्यात आली तसेच त्यांना सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या.
विद्यार्थिनींनी कोणत्याही प्रकारचा त्रास सहन न करता तत्काळ पोलीस किंवा दामिनी पथकाशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. महिला विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक सतत कार्यरत असून शैक्षणिक परिसरात निर्भय वातावरण निर्माण करणे हेच या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थिनी व पालकांमध्ये सुरक्षिततेबाबत विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
